शंकराची पिंडी हटविण्याचा आदेश देत असताना रजिस्ट्रार बेशुद्ध झाले, न्यायमूर्तींनी तत्काळ निर्णय बदलला

कलकत्ता उच्च न्यायालयात एक घटना अशी घडली, जिची चर्चा फक्त वकिलांमध्येच नाही तर संपूर्ण कलकत्त्यामध्ये व्हायला लागली आहे. आदेश लिहिला जात असताना घडलेल्या घटनांमुळे न्यायमूर्तींनी आपला आदेशच बदलून टाकला.

एका वादग्रस्त जमिनीवर असलेली शंकराची पिंडी हटविण्याचा आदेश लिहिला जात असताना सहाय्यक रसिस्ट्रार चक्कर येऊन पडले. त्यांची ही अवस्था पाहून न्यायमूर्ती देखील आश्चर्यचकीत झाले होते. ही घटना पाहून न्यायमूर्तींना आपला निर्णय बदलला आणि हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे पाठवत दिवाणी खटल्याप्रमाणे यावर सुनावणी घ्यावे असे निर्देश दिले.

प्रकरण काय आहे ?

बंगालमधील मुर्शिदाबादमधल्या बेलडांगातील खिदीरपूरमध्ये सुदीप पाल आणि गोविंद मंडल यांच्यात जमिनीवरून संघर्ष सुरू होता. मे 2022 मध्ये जमिनीवरून या दोघांमध्ये मारहाण झाली होती. सुदीप पाल याचे म्हणणे आहे की जमीन बळाकवण्यासाठी मंडल याने एका रात्रीत या जमिनीवर शंकराची पिंडी स्थापित केली. याबाबत पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. यामुळे सुदीप यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सुदीप यांच्या वकिलांनी म्हटलंय की मंडल यांनी मुद्दाम या जमिनीवर शंकराच्या पिंडीची स्थापना केली. गोविंद मंडल यांच्या वकिलांनी याचा इन्कार करत शंकराची पिंडी ही स्वयंभू असल्याचे म्हचले आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी शंकराची पिंडी या जागेवरून हटविण्यात यावी असे आदेश दिले होते. हा आदेश लिहिला जात असताना सहाय्यक रजिस्ट्रार विश्वनाथ राय हे बेशुद्ध झाले. ते बेशुद्ध झाल्याचे पाहताच न्यायमूर्तींनी ताबडतोब आपला आदेश बदलला आणि हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयाकडे पाठवलं.