घरात बनावट नोटा छापणाऱया दोघांना अटक; बीकेसी पोलिसांची कारवाई

बनावट नोटा चलनात आणून आपला खिसा भरायचा या उद्देशाने घरातच बनावट नोटा छापणाऱया दोघांना बीकेसी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. एकाच्या घरातून पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे प्रिंटर, लॅपटॉप, मोबाईल असे साहित्य तसेच 45 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा तसेच काही खऱया नोटा असा एक लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वांद्रे पूर्वेकडील भारतनगरातल्या पत्थरनगरात राहणारे दोन तरुण घरातच बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणत असल्याची माहिती बीकेसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एसीपी सुहास कांबळे, वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष कांबळे, उपनिरीक्षक राजाभाऊ गरड, सुनील वाघ व पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी शिताफीने बनावट नोटा छापणाऱया नौशाद पीर मोहम्मद शाह (36) आणि अली मेहंदी तेहजीब हसन सय्यद (26) या दोघांची नावे समोर आली. मग पोलिसांनी फेरीवाला म्हणून काम करणाऱया अलीला बनावट नोटांसह पकडले. तेव्हा टेलरचे काम करणाऱया नौशादच्या घरात बनावट नोटा छापत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी नौशादचे घर गाठून त्याला उचलले.

यूटय़ूबवरून सुचली आयडिया

बनावट नोटा छापून मालामाल व्हायची शक्कल अली सय्यदच्या डोक्यात आली. मग त्याने नौशादला सांगून संगनमताने हे कृत्य करायचे ठरवले. त्यांनी युटय़ूबवर बघून काही प्रमाणात बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच या दोघा भामटय़ांना वेळीच रोखून बीकेसी पोलिसांनी बनावट नोटांचा कारभार उधळून लावला.