वेब न्यूज – मोनालिसा

>> स्पायडरमॅन

इंटरनेटच्या विश्वात सतत काही ना काही रोचक चर्चा रंगत असतात. या चर्चांमधून कधी अनोखे खुलासे वाचायला मिळतात, तर कधी आश्चर्यकारक गोष्टी वाचायला मिळतात. सध्या लिओनार्दो द विन्सीच्या अजरामर अशा मोनालिसा या चित्रावर चर्चा रंगलेली आहे. मोनालिसा खरी कोण होती या प्रश्नावर अनेक जण आपापली मते मांडत आहेत. सामान्य माणसापासून ते कलाविश्वातील दिग्गजांपर्यंत अनेक जण यावर अभ्यासू माहिती देताना दिसत आहेत. मोनालिसाबद्दल रोज नवे नवे खुलासे वाचायला मिळत आहेत.

चित्रकलेचे अभ्यासक असलेल्या काही जणांनी मोनालिसा ही खरे तर लिओनार्दो द विन्सीचे स्वतःचे स्त्राr रूप आहे असा दावा केला आहे. लिओनार्दोला स्वतःला स्त्राr रूपात बघण्याची खूप इच्छा होती आणि त्यामुळे त्याने स्वतःला मोनालिसाच्या रूपात साकारल्याचा त्यांचा दावा आहे, तर दुसरीकडे मोनालिसा ही प्रत्यक्षात लिओनार्दोची आई पॅटरीना असल्याचा दावा अभ्यासकांच्या दुसऱया गटाने केला आहे. बऱयाच इतिहासकारांचा असा दावा आहे की, मोनालिसा ही फ्रेंच व्यापारी फ्रान्सिस्को डी बार्टोलोमियो डेल जिओकोंडो यांची पत्नी होती. तिचे खरे नाव लिसा डेल जिओकोंडो होते. 1550 साली जॉर्जियो वसारी यांनी लिहिलेल्या विन्सीच्या चरित्रातही अशीच काही तथ्ये लिहिली आहेत असे सांगतात.

मोनालिसाच्या चित्रावर अनेक वर्षे फ्रान्सच्या राजघराण्याचा कब्जा होता. विन्सी हा फ्रान्सचा राजा फिलिप्स (पहिला) याच्या दरबारात कामाला होता. 1519 मध्ये विन्सीच्या मृत्यूनंतर त्याचे हे सुप्रसिद्ध चित्र राजाच्या ताब्यात गेले. अनेक वर्षे ते राजघराण्याच्या ताब्यात होते. मात्र पुढे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात लोकांनी ते राजघराण्याकडून हिसकावले. गमतीचा भाग म्हणजे मोनालिसाचे हे सुप्रसिद्ध चित्र एकदा चोरीलादेखील गेले होते. 1911 साली चोरीला गेलेले हे चित्र तब्बल 28 महिन्यांनी पुन्हा परत मिळाले. हे चित्र काही काळ नेपोलियनच्या बेडरूममध्येदेखील सजवण्यात आल्याचे सांगण्यात येते. सध्या हे चित्र ल्यूर संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे.