महागाईची गॅरंटी – भाज्या कडाडल्या; कोथिंबीर, शेपू 50 रुपये जुडी तर मिरचीने गाठली शंभरी

मोदी सरकारच्या काळात घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलपासून ते खाद्यतेल आणि डाळी अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता भाज्यांचे दरही कडाडले आहेत. कोथिंबीर आणि शेपूने पन्नाशी तर मिरचीने शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य हवालदिल झाला असून हीच आहे का मोदी सरकारची महागाईची गॅरंटी, असा संतप्त सवाल आता विचारत आहेत.

घाऊक आणि किरकोळ बाजारात फळभाज्यांसोबत पालेभाज्यांचे दर गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत 20 ते 30 रुपयांनी महागले आहेत. जेवणाची लज्जत वाढवणाऱया कोथिंबिरीची आवक लातूरमधून मोठय़ा प्रमाणात होते. 20 ते 25 रुपयाला मिळणाऱया कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी आता 50 रुपये मोजावे लागतायत. शेपूचे दरही 25 रुपयांवरून 50 रुपयांवर पोहोचले. 60 ते 80 रुपयांना मिळणाऱया मिरच्यांनी आता शंभरी गाठली असून टोमॅटोसाठी 40 रुपये मोजावे लागत आहेत.

गृहिणींचे बजेट खरेदीला प्राधान्य

भाज्यांचे दर कडाडल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे. आधी ज्या भाज्या किलोभर खरेदी केल्या जायच्या त्या आता पावकिलो किंवा अर्धाकिलो खरेदी केल्या जात आहेत.

विक्रेत्यांना भुर्दंड

राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतमालाला बसला असून बाजारातील भाज्यांची आवक घटली आहे. त्यातच मुंबईत उन्हाच्या कडाक्यामुळे अर्ध्याहून अधिक माल सडतो याचाही भुर्दंड विक्रेत्यांना सहन करावा लागतोय, असे भाजी विक्रेते सूर्यकांत पंदरपळे यांनी सांगितले.

एक लिंबू 8 रुपये

मुंबईतील वाढत्या उकाडय़ामुळे काकडी आणि लिंबांना चांगलीच मागणी असून एका लिंबासाठी आठ रुपये आकारले जात असून काकडीचा दर 50 वरून 80 रुपयांवर पोहोचला आहे. वांगी, कारली, पापडी यांचे दरही 60 ते 70 रुपये किलो आहेत.