डोंबिवली स्फोट; कंपनीमालक मलया मेहताला अटक, मृतांचा आकडा 11 वर

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी कंपनीमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मलया प्रदीप मेहता (38) असे त्याचे नाव आहे. ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दरम्यान स्फोटातील मृतांची संख्या 11 झाली आहे.

आज तीन मृतदेह ढिगाऱयाखालून काढण्यात आले. 68 हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. एमआयडीसी फेज -2 मध्ये असलेल्या अमुदान कंपनीत गुरुवारी रिअॅक्टर फुटला आणि मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, त्याचा हादरा तीन किलोमीटरपर्यंत बसला. आजूबाजूच्या 15 इमारतींच्या काचा फुटल्या. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 68 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटात 50 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे.

मालती मेहता नाशकातून ताब्यात

कंपनीतील रिअॅक्टर स्फोटप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात कंपनीचे मालक मलया मेहता याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर ते फरार होते. त्यांच्या शोधासाठी ठाणे क्राईम ब्रँचने पथके तयार केली होती. आज एका पथकाने नाशिकमधून मालती यांना ताब्यात घेतले, तर ठाणे येथून मलया यांना अटक करण्यात आली.

अमुदान कंपनीला क्लोजर नोटीस

भीषण स्पह्टात 11 जणांचे बळी घेणाऱया अमुदान पंपनीला क्लोजर नोटीस बजावण्यात आली आहे. या स्फोटाची राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली असून कंपनी कायमची बंद का करू नये, अशी विचारणा केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाने ही नोटीस बजावली असून कंपनी व्यवस्थापन त्याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.