अव्हेंजर्समधील अभिनेत्रीच्या देखणा बंगल्यात फुकटात राहण्याची संधी

आयर्न मॅनची मोठ्या पडद्यावरील प्रेयसी, अव्हेंजर्स चित्रपट मालिकेतील देखणी अभिनेत्री, ऑस्कर विजेती ग्वेनेथ पालट्रो हिचा अत्यंत देखणा बंगला राहण्यासाठी भाड्याने उपलब्ध झाला आहे. या बंगल्यात राहण्यासाठी आपल्याला लाखो रुपये खर्च करावे लागत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा समज खोटा आहे. कारण या बंगल्यात तुम्हाला फुकटात राहता येणार आहे. AIRBNB वर हा बंगला उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्वेनेथचा स्वत:चा ब्रँड आहे ज्याचं नाव गूप (GOOP LIFESTYLE) आहे. या कंपनीची संस्थापक असलेल्या ग्वेनेथने तिचा बंगला फक्त एका रात्रीसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंगला म्हणजे तिचं गेस्टहाऊस असून तो एअरबीएनबीवर झळकला आहे.

या बंगल्याची वैशिष्ट्ये सांगायची म्हणजे त्यात एक बेडरूम असून, बाथरूम असलेले स्वतंत्र गेस्टहाऊसही आहे. माँटेसिटोमध्ये हा बंगला असून त्यासाठीचं बुकींग 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. हा बंगला 9 सप्टेंबर, शनिवनारसाठीच उपलब्ध असून फक्त 2 पाहुणेच यात राहू शकतील. या बंगल्यात राहून मनाला शांतता मिळते आणि अनेक गोष्टी स्पष्ट होत जातात. मी तिथे पुन्हा ताजं-तवानं होण्यासाठी जात असते. गूपसाठी, माझ्या कुटुंबासाठी , मित्र-मैत्रिणींसाठी आपल्याला काय करायचं आहे याबाबत मी इथे येऊन विचार करत असते असं ग्वेनेथने म्हटलं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला मला जितका आनंद होतो तितकाच तुम्हालाही होईल असं ग्वेनेथने म्हटले आहे.

या बंगल्यापुढील मोकळी जागा आणि पूल यामध्ये पाहुण्यांना जाता येईल, मात्र मुख्य घर त्यांना वापरता येणार नाही. दुपारी 4 वाजता चेकइन असेल आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता चेकआऊट असेल. इथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ग्वेनेथ स्वत: तिथे हजर असणार आहे. पाहुण्यांसाठी मोफत पार्किंग, एसी अशा सुविधाही असतील. या प्रॉपर्टीमध्ये पाळीव प्राणी आणण्यास मनाई आहे. धुम्रपान, अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर कृत्यांनाही मनाई आहे. या बंगल्यात कोणत्याही परिस्थिती पार्ट्यांना परवानगी नाही असं ग्वेनेथने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.