निवडणूक जिंकण्यासाठी कायपण…राजकीय सूडबुद्धीने ‘विठ्ठल’वर कारवाई; पाठिंबा देताच जप्तीची कारवाई मागे

महाविकास आघाडीचा प्रचार केला म्हणून विठ्ठल साखर कारखान्यावर 26 तारखेला जप्तीची कारवाईची नोटीस बजावण्यात आली. 29 तारखेला भाजपला पाठिंबा दिला आणि 4 मे रोजी जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली. भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे आणि तो गाठण्यासाठी शासकीय यंत्रणांचा वाट्टेल तसा वापर सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिह्यातील नेते, श्री विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली. बँकेकडून घेतलेल्या थकीत कर्जापोटी ही कारवाई केल्याचे बँकेचे म्हणणे होते. मात्र, ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याची भावना कारखान्याच्या सभासदांमध्ये होती. श्री विठ्ठल कारखान्याचे 30 हजार सभासद आहेत. घरटी तीन व्यक्ती धरल्या तर सुमारे एक लाख मतदार या कारखान्याशी जोडला गेला आहे.

कारखान्याचा हा मतदार परंपरागत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जोडला गेलेला आहे. माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत या विठ्ठल परिवाराची निर्णायक मते आहेत. लोकसभेचे रणशिंग फुकल्यानंतर अभिजीत पाटील यांनी महाविकास आघाडीचा प्रचार सुरू केला होता.

‘एक्झिट पोल’नुसार माढा आणि सोलापूर हे दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी जड असल्याचे दाखविण्यात आल्याने भाजपने महाविकास आघाडीतील नेते फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार अभिजीत पाटील हे भाजपचे पहिले लक्ष्य ठरले असून, तत्कालीन संचालक मंडळाने घेतलेल्या कर्जासाठी विठ्ठल कारखान्याची साखर गोदामे राज्य सहकारी बँकेने सील केली.

‘कर्ज भरा; मगच जप्तीची कारवाई मागे घेऊ’, अशी भूमिका बँक अधिकाऱयांनी घेतली होती. 26 एप्रिलला ही कारवाई झाली. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 29 एप्रिलला अभिजीत पाटील यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आज (दि. 4) कर्जाचा एक रुपयादेखील न भरता बँकेने जप्तीची कारवाई मागे घेतली आहे.

भाजपने केलेल्या या राजकीय कारवाईमुळे कारखान्याच्या सभासद शेतकऱयांमध्ये प्रचंड असंतोष उफाळला असून, कारखान्याच्या अध्यक्षाला बळजबरीने प्रचाराला जुंपल्याची भावना वाढीस लागली आहे. महाविकास आघाडीतील धडाडीच्या शिलेदारांची कोंडी करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी साम-दाम-दंड यांचा अतिरेकी वापर सुरू असून, भाजपच्या या रडीच्या डावामुळे लोकांमध्ये युतीच्या उमेदवाराबद्दलचा रोष अधिक वाढीस लागत आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या (दि. 5)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विठ्ठल कारखान्यावर सभा होणार आहे.