नाशिकमध्ये मिंधे सरकारचा 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, मुख्यमंत्री लाभार्थी; संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला

मिंधे सरकारने नाशिक महापालिकेच्या हद्दीत 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून केला आहे. या घोटाळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक थेट लाभार्थी आहेत. दोन दिवसांत या घोटाळय़ाचे पुरावे सादर करून स्फोटकरणार असल्याचा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असतानाच संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत बॉम्ब टाकला असून मिंधेंची झोप उडवणारी ही पोस्ट आहे.

मोदी राजवटीत भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

‘मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण! नाशिक महानगरपालिका हद्दीत 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातील थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोटकरीन. तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांत झोपावे. महाराष्ट्र कोण लुटत आहे?’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.