निमित्त : मधुभाई – जीवेत शरद शतम्!

>> मेघना साने

करूळ गावातील एक सन्माननीय खोत मंगेशदादा कर्णिक यांचा धाकटा मुलगा मधु हा वयाच्या आठव्या वर्षापर्यंत शाळेत जायलाच तयार नव्हता. आईने आणि मोठय़ा भावाने त्याला मारून मुटकून शाळेत पाठवले. पुढे कणकवलीत गेल्यावर तेथील शाळेत मधुला वाचनाची गोडी लागली. आणि शाळेच्या मासिकात लिहूदेखील लागला. पण परिस्थितीमुळे मधुला मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेता आले. हा मधु म्हणजे आजचे सुप्रसिद्ध लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक! त्यांच्या 93व्या वाढदिवसानिमित्त हा लेख…

मॅट्रिक पास पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यावर आजवर काहींनी पीएच.डी.केलेली आहे. काही महाविद्यालयांत त्यांची पुस्तके अभ्यासक्रमात आहेत. मुलांच्या पाठय़पुस्तकांतही त्यांचे धडे आहेत. मधुभाईंनी मोठमोठय़ा पदांवर नोकऱया केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणूनही काम बघितले. मुंबईत सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून उच्चपदस्थ लोकांबरोबर काम केले. पण आज वयाच्या 93 व्या वर्षीही ते स्वतला ‘करूळचा मुलगा’च म्हणवतात. आपल्या आत्मचरित्राचे शीर्षक त्यांनी ‘करूळचा मुलगा’ हेच दिले आहे.

मधुभाईंना कोकणाबद्दल, आपल्या जन्मगावाबद्दल खूप प्रेम आणि अभिमान आहे. मधुभाईंच्या वडिलांनी, मंगेशदादांनी 1918 साली करूळमध्ये श्री ज्ञानेश्वर प्रासादिक मराठी शाळा अशी चौथीपर्यंतची मराठी शाळा स्थापन केली होती. त्यापूर्वी त्या गावात एकही शाळा नव्हती. पुढे मधुभाईंनी 1978 साली तेथे इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. तेव्हापासून गोपाळ भोरपी समाजाची, तसेच शेतकरी, कामगार यांचीही मुले तिथे हायस्कुलचे शिक्षण घेऊ लागली. मधुभाईंनी आपली अकरा एकर जमीन वनराई ट्रस्टतर्फे या शाळेला देणगीदाखल दिली. या शाळेला त्यांनी नाव दिले आहे नाथ पै ज्ञानप्रबोधिनी शाळा. केवळ 28 मुलांवर सुरू झालेल्या या शाळेत आज 400 च्या वर मुले आहेत.

मधु मंगेश कर्णिक हे सजग, संवेदनशील व अत्यंत अभ्यासू नागरिक असून सकारात्मक विचारसरणीतून समाजाच्या उन्नतीसाठी धडपडणारे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्र बेळगाव सीमाप्रश्नावर 1970 मध्ये त्यांनी ‘अ केस फॉर जस्टीस’ नावाचा अनुबोधपट अत्यंत परिश्रम घेऊन तयार केला होता. 1973 ते 1983 या काळात कर्णिक लघु उद्योग महामंडळाचे आधी व्यवस्थापक आणि नंतर सरव्यवस्थापक झाले. लघु उद्योग मंडळातील अनुभवावर ‘लघु उद्योगाचे निवडक शंभर प्रकल्प अहवाल’ या स्वरूपाचे पुस्तक त्यांनी तयार केले. हे पुस्तक लघु उद्योगासंबंधी नवउद्योजकांना संपूर्ण मार्गदर्शन करणारे आहे. तसेच आणखी एक पुस्तक त्यांनी तयार केले ‘आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट.’ हे इंग्रजी पुस्तक मधु मंगेश कर्णिक यांनी विठ्ठल राज्याध्यक्ष यांच्या सहकार्याने लिहिले. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विषयक अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश झाला.

नोकरीनिमित्त मधुभाई कोल्हापूर, गोवा, मुंबई इत्यादि ठिकाणी राहिले. गोव्याचा निसर्गही त्यांनी भरभरून उपभोगला. ‘जिवाभावाचा गोवा’ असे त्यांचे ललित लेखांचे पुस्तक आपल्याला गोव्याची सफर घडवते. कोकण तर त्यांची जन्मभूमीच. तेथील माणसांवर, त्यांच्या स्वभावांवर, समस्यांवर, गावात झालेल्या बदलांवर त्यांनी खूप लिहिले. ‘कोंकणी ग वस्ती’, ‘काळे कातळ तांबडी माती’ आणि ‘तोरण’ अशा त्यांच्या काही ग्रामीण कथासंग्रहांमधून आपल्याला ग्रामीण संवेदना जाणवते. गावात सर्व्हिस मोटर आली, पिठाची गिरणी आली, कूळ कायदा आला तेव्हा गावातील संस्कृतीही बदलली हे आपले निरीक्षण त्यांनी त्यांच्या कथांमधून मांडले आहे.

मधु मंगेश कर्णिकांची पहिली नोकरी कोकणात बंदरगावी एस.टी.चे रायटर म्हणून होती. त्यावेळी त्यांचे लेखन सुरू झाले होते. त्यांच्या कथा मासिकांमधून प्रकाशित होत होत्या. या नोकरीच्या निमित्ताने त्यांना तळागाळातील माणसेही पाहायला मिळाली. काही ड्रायव्हर, कंडक्टर, खाणावळवाले, होडी चालवणारे नावाडी यांचेही जीवन जवळून पाहायला मिळाले. मधुभाईंच्या कथांमध्ये अशी विविध माणसे, त्यांचे स्वभाव, त्यांच्या लकबी, त्यांची बोली घेऊन जिवंत होतात. केवळ माणसांबद्दलच नव्हे तर झाडापेडांबद्दल, पशुपक्ष्यांबद्दलही ते संवेदनशील मनाने लिहीत असतात. त्यांचा ‘सोबत’ हा ललित लेखसंग्रह याची साक्ष देतो.

कर्णिकांची ‘माहीमची खाडी’ ही कादंबरी तर बहुचर्चित आहेच. पण 1962 साली एका भाविणीला नायिका कल्पून लिहिलेली ‘देवकी’ ही कादंबरी किंवा एका पांगळ्या मुलाच्या जीवनावर कल्पनेने लिहिलेली ‘सूर्यफूल’ ही कादंबरी वाचली की त्यांच्या भावनाप्रधान मनाचे दर्शन होते. भाविणीसाठी समाजाने निर्माण केलेल्या रूढीपरंपरा किती जाचक होत्या याचे भान त्यांना त्या काळातच आले होते. ‘सूर्यफूल’ कादंबरीत एका पांगळ्या मुलाचे भावविश्व रेखाटताना ते त्याच्याशी पूर्ण समरस होतात आणि त्याच्या मनाची वेदना आपल्यापर्यंत पोहोचवतात. या दोन्ही कादंबऱया हे त्यांच्या प्रांजळ मनाचे हुंकार आहेत.

सचिवालयातील नोकरीमुळे उद्योग जगतातील माणसे त्यांना जवळून पाहायला मिळाली. भ्रष्टाचार कसा होऊ शकतो हे कळू लागले. तेथील राजकारणसुद्धा पाहायला मिळाले. या अनुभवावर उच्चभ्रू समाजातील पात्रे असलेल्या ‘वारुळ’ आणि ‘सनद’ या कादंबऱया बेतल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर होत असलेल्या सामाजिक बदलांचे ते साक्षीदार आहेत. समाजातील कोसळत जाणारी मूल्ये, वाढत चाललेली गुंडगिरी आणि संभ्रमित असलेला सुसंस्कारित मध्यमवर्ग याचं प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ‘संधिकाल’ या कादंबरीत दिलं आहे.

मधुभाईंच्या एकूण 13 कादंबऱया आणि 42 कथासंग्रह आहेत. मधुभाईंची कथा आपल्या मनावर ठसा उमटवते. त्यांची ‘चंद्रलोक’ ही कथा वाचल्यावर माथाडी कामगारांचेही एक भावविश्व असते याची आपल्याला जाणीव होते. मधुभाईंच्या कथेत कार्यकर्ते, कलाकार यांचेही जीवन येते. स्त्राr-पुरुष संबंधांवरही त्यांच्या अनेक कथा भाष्य करतात. स्त्राr ही जेव्हा पुरुषात संपूर्ण विलीन होते तेव्हा तिची इच्छा मातृत्व प्राप्त करण्याची असते असे मधुभाईंच्या कथांमधून व्यक्त होते.

1990 मध्ये मधु मंगेश कर्णिक हे रत्नागिरी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर लगेच 1991 मध्ये मधु मंगेश कर्णिक यांनी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’ची स्थापना केली. कोकणातले तरुण कवी, लेखक यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच कोकणातून साहित्य तयार व्हावे ही त्यांची मनीषा होती. आज या संस्थेची धुरा साहित्यिका माननीय नमिता कीर सांभाळीत आहेत. आज वयाच्या 93 व्या वर्षीसुद्धा संस्थेच्या संमेलनांना उपस्थित राहून मधुभाई साहित्यिकांना आशीर्वाद देत असतातच. त्याच वेळी नवोदितांच्या लेखनाची उत्सुकतेने चौकशी करीत असतात. त्यांची स्वतची लेखणीही अव्याहत सुरूच आहे.