शिंदे गटातच श्रेयवादासाठी चढाओढ; करमाळय़ात मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स फाडली

करमाळा शहर आणि जेऊर बस स्थानकांतील सुशोभीकरणाचा श्रेयवाद लाटण्याची शिंदे गटातच चढाओढ सुरू झाली आहे.  श्रेयवाद लाटण्यावरून मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे लावण्यात आलेली पोस्टर्स फाडून टाकण्यात आल्यामुळे दोन गटांतील गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे.

करमाळा तालुक्यातील करमाळा व जेऊर शहरांतील बस स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीमंजुरीचे श्रेय घेण्यासाठी शिंदे गटाचे महेश चिवटे व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात चढाओढ लागली आहे. नारायण पाटील यांचे सर्व राजकीय कामकाज जेऊर गावातील कार्यालयातून चालते. याच जेऊरमध्ये महेश चिवटे यांचे जेऊर येथील समर्थक व शिंदे गटाचे उपतालुकाप्रमुख दादासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले होते. या बॅनरवरून माजी आमदार नारायण पाटील यांचा फोटो वगळण्यात आला होता.

जेऊर ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून माजी आमदार नारायण पाटील गटाची सत्ता आहे. श्रेयासाठी चिवटे व पाटील यांच्यात चढाओढ सुरू असताना जेऊर शहरातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या अभिनंदनाचे लावण्यात आलेली पोस्टर्स फाडण्यात आली आहेत. याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

शिवप्रेमींमध्ये संताप 

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचेही छायाचित्र छापण्यात आले होते. त्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, परवानगी न घेता पोस्टर्स लावणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.