मुंबईसह देशभरात भीम जयंतीचा उत्साह; राज्यपाल, पालिका आयुक्तांकडून अभिवादन

हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे शिल्पकार, कोटय़वधी दलितांचे मुक्तिदाते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मुंबईसह देशभरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईत राज्यपाल रमेश बैस तसेच मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. राज्य आणि देशभरात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली तर कार्यक्रमादरम्यान राज्यपालांच्या बौद्ध भिक्खूंना चिवरदान (पवित्र वस्त्र) देण्यात आले. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी मुंबई शहर कार्यालयातर्फे चैत्यभूमी येथे मतदार जागृतीसाठी आयोजित स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत राज्यपालांनी ’मी मतदानाचा हक्क बजावणारच’ लिहिलेल्या फलकावर स्वाक्षरी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपआयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त (जी-उत्तर विभाग) अजितकुमार आंबी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच दर्शना आंबेडकर, नागसेन कांबळे, रमेश जाधव, रवी गरूड, महेंद्र साळवे आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह देशभरातून अनुयायांनी गर्दी केली होती. अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी अनुयायांना पिण्याच्या पाण्यासह उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारण्यात आला होता.

महापालिका मुख्यालयात जयंती साजरी
मुंबई महापालिका मुख्यालयातीलल सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे यांनी पालिका प्रशासनाच्यावतीने पुष्पहार अर्पण केला. यावेळी महापालिका उपसचिव मंजिरी देशपांडे उपस्थित होत्या.

फटाक्यांची आतषबाजी
मुंबईत शनिवारी रात्री 12 वाजताच फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने मेणबत्ती पेटवून आबालवृद्धांनी आदरांजली वाहण्यात आली. काही ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो घेऊन बच्चे कंपनी पालकांसह बाहेर पडले. ’जय भीम’, ‘बाबासाहेबांचा विजय असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.