भीमाशंकर – कल्याण एसटीला अपघात, 35 प्रवासी जखमी

accident-near-ghodegaon

भीमाशंकरहून कल्याणकडे निघालेल्या एसटी बसला गिरवली गावाजवळील एका वळणावर अपघात झाला. यात प्रवास करत असलेले 35 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या उत्तरेकडील हिंदुस्थानी नागरिकांचा श्रावण सुरू असल्याने या बसमध्ये मुंबईमधील अनेक हिंदी भाविक होते. घोडेगाव वरून सकाळी 9 चे दरम्यान कल्याणला निघालेली बस जुन्नर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या गिरवली गावच्या पुढे अवघड वळणावरघसरली व गाडी पुलाचे कुठडे तोडून खाली गेली. नुकताच पाऊस झाला असल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यामूळे हा अपघात झाला असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे.

यामध्ये जखमी झालेल्या 35 प्रवाशांना घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, उपसरपंच संतोष सैद, भाऊसाहेब सैद पाटील व ग्रामस्थांनी खासगी वाहनांनी व रुग्णवाहिका यामध्ये घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पोहचवले या सर्व 35 जखमींवर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत अनेकांना हाताला, पायाला, डोक्याला किरकोळ मार लागला आहे.

दरम्यान, आंबेगाव गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, माजी उपसभापती संतोष भोर, रामदास वळसे पाटील यांनी अपघातग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत करत होते.