रांचीमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव; कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी

केरळनंतर आता झारखंडची राजधानी रांचीमध्ये बर्ड फ्लूने डोकेवर काढले आहे. रांचीमधील होटवार येथील प्रादेशिक पोल्ट्री फार्ममधून कोंबड्याचे नमुने भोपाळला पाठवण्यात आले होते. तिथे भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) केलेल्या चाचणीत कोंबड्यांमध्ये A5N1 एव्हियन इन्फ्लूएंझा (बर्ड फ्लू) चे विषाणू आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बर्ड फ्लूची साथ परसरल्याचे निश्चित झाल्यावर जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत रांचीच्या होटवार परिसरात कोंबडी व अंडी खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे.पशुसंवर्धन विभागाचे पथक संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी देखील होत आहे. नागरिकांच्या चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच हा परिसर बर्ड फ्लूमुक्त घोषित केला जाईल. राजधानी रांचीच्या इतर भागात बर्ड फ्लूचा संसर्ग पसरू नये आणि लोकांना त्याचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने कृती आराखडाही तयार केला आहे.

रांचीचे उपायुक्त जिल्हा दंडाधिकारी राहुल कुमार सिंह यांच्या आदेशानुसार रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आली आहे. रॅपिड रिस्पॉन्स टीममध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॅपिड रिस्पॉन्स टीममधील कर्मचाऱ्यांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसोबत जवळपासच्या गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रांचीच्या होटवारमध्ये ज्या भागांचे सर्वेक्षण केले जाणार आहे त्यामध्ये गाडी गाव, गाडी होटवार, खटंगा, नवीन खतंगा, महुआ टोली, आर्मी कॅम्प, दाम गाडी, दुमडगा, बुटी मोड या भागांचा समावेश आहे. रांची उपायुक्तांनी स्थापन केलेले रॅपिड रिस्पॉन्स पथक आजपासून या भागांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे. लोकांना चिकन आणि अंडी न खाण्याचा सल्ला दिला जात आहे. याशिवाय आरोग्य विभागालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.