गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा पत्ता कट; गडकरींना अखेर उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवार आज जाहीर केले. त्यात नागपूरमधून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून बीडमधून खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना संधी दिली गेली आहे. दिल्लीत जाण्यास उत्सुक नसलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिली आहे.

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून राज्यसभेच तिकीट नाकारण्यात आलेले केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना तर ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना पुन्हा उमेदवारी नाकारत आमदार मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर जळगावमधून स्मिता वाघ यांना लोकसभेची लॉटरी लागली आहे. भाजपचे महासचिव अरुणसिंग यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या देशभरातील 72 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, दिल्ली, दादरा नगर हवेली येथील उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील या विद्यमान मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यसभेत प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना तर अकोल्यातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना लोकसभेला संधी दिली आहे.

इच्छा नसतानाही मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात
लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न चालविला होता. दिल्लीला जायची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. तरी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपकडून रिंगणात उतरविण्यात आले आहे.

पुण्यातून मोहोळ यांना संधी
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी काही महिन्यांपासून यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले होते. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपने येथून संधी दिली आहे.

यांना परत उमेदवारी
नितीन गडकरी (नागपूर), रावसाहेब दानवे (जालना), हीना गावीत (नंदुरबार), सुभाष भामरे (धुळे), प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड), रक्षा खडसे (रावेर), रामदास तडस (वर्धा), भारती पवार (दिंडोरी), कपिल पाटील (भिवंडी), सुजय विखे-पाटील (नगर), सुधाकर शृंगारे (लातूर), रणजितसिंह निंबाळकर (माढा), संजयकाका पाटील (सांगली)

पूनम महाजन यांना धाकधूक
भाजपच्या पहिल्या यादीत पूनम महाजन यांच्या नावाचा समावेश नाही, यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत महाजन यांच्याबाबत नाराजी दिसून आली. यामुळे त्यांची उमेदवारी कापून नवा चेहरा भाजपकडून दिला जाण्याची शक्यता आहे.

पाच खासदारांना घरी बसवले
महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत भाजपने पाच विद्यमान खासदारांना घरी बसवले आहे. यामध्ये गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), मनोज कोटक (ईशान्य मुंबई), प्रीतम मुंडे (बीड), उन्मेष पाटील (जळगाव) आणि संजय धोत्रे (अकोला) या विद्यमान खासदारांचे तिकीट कापून त्यांना घरी बसवले आहे. बीड, अकोल्यात विद्यमान खासदारांच्या घरातील उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.

हरयाणाच्या करनालमधून खट्टर तर हिमाचलच्या हमीरपूरमधून अनुराग ठाकूर

लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या दुसऱया यादीत हरयाणाच्या करनालमधून मनोहरलाल खट्टर, हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर येथून अनुराग ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. दादरा नगर हवेलीतून कलाबेन डेलकर, पूर्व दिल्लीतून हर्ष मल्होत्रा, गुजरातच्या वलसाड येथून धवल पटेल, हरयाणाच्या भिवानी-महेंद्रगढ येथून चौधरी धरमवीर सिंह आणि सिरसातून अशोक तंवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कर्नाटकच्या धारवाड येथून पेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा बी. वाय. राघवेंद्र यांना शिमोगातून तर माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कर्नाटकच्या हावेरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

जागावाटपाआधीच यादी
शिंदे गट व अजितदादा गटाला लोकसभेच्या किती जागा मिळणार याबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. महायुतीचे जागावाटपाचे सुत्र निश्चित होण्याआधीच भाजपकडून जागावाटप जाहीर करण्यात आले.