सोने लाखमोलाचे होणार; 10 ग्रॅमसाठी एक लाख रुपये मोजावे लागणार, चांदीचीही चांदी होणार

सोन्याला सध्या चांगलीच झळाळी आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दराने जबरदस्त उसळी घेतली आहे. सोन्याचे दर शुक्रवारी प्रतितोळा 10 ग्रॅमसाठी 73,174 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. आता जगभरातील सध्य परिस्थितीमुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी एक लाखांवर जणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

आता लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यात येते. मात्र, सोन्याचे दर आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांनी सोने खरेदी टाळली आहे. तसेच यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तालाही अनेकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. सोन्यासह चांदीचेही भाव वाढत आहे. सध्या चांदीचे दर 83819 रुपये प्रति किलो वर पोहोचले आहेत.

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धसदृश्य परिस्थितीचा जगावर परिणाम होत आहे. या दोन्ही देशातील तणावामुळे शेअर बाजारावर परिणाम झाला असून बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तसेच ज्यावेळी शेअर बाजारात घसरण होते, त्यावेळी सोन्यात आणि चांदीत गुंतवणूक वाढते.त्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढतात. आता या दोन देशात वाढलेला तणाव कायम राहिल्यास शेअर बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीचा भाव आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

फेब्रुवारी महिन्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने तेजी दिसत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,424.32 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात चारपट वाढ झाली होती. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. चांदीच्या दरातही चार पटीने वाढ झाली आहे. सध्या चांदीचा दर 29.60 डॉलर प्रति औंस असून तो 2021 सालानंतरचा सर्वाधिक दर आहे.