‘…तर मी राजीनामा देईन’; CAA विरोधादरम्यान हिमंता सरमा यांचं मोठं विधान

केंद्र सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा CAA नियम अधिसूचित केल्याच्या एका दिवसानंतर, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली की, ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) साठी अर्ज न केलेल्या एकाही व्यक्तीला नव्याने लागू झालेल्या कायद्यानुसार नागरिकत्व दिले तर ते आपल्या पदावरून पायउतार होणारे ते पहिले असतील’.

‘मी आसामचा मुलगा आहे आणि जर NRC साठी अर्ज न केलेल्या एकाही व्यक्तीला नागरिकत्व मिळाले तर मी राजीनामा देणारा पहिला असेल’, असं हिमंता सरमा यांनी शिवसागर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं.

सोमवारी वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केल्याबद्दल विरोधी पक्षांनी केंद्रावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अनधिकृत गैर-मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व प्रदान करण्याचा या कायद्याचा उद्देश आहे.

हिमंता सरमा म्हणाले की CAA हा नवीन कायदा नाही, कारण तो पूर्वी लागू करण्यात आला होता आणि लोकांना रस्त्यावर उतरण्यात काही अर्थ नाही असं सांगून नियुक्त पोर्टलद्वारे अर्ज करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

‘पोर्टलवरील डेटा आता बोलेल, आणि कायद्याला विरोध करणाऱ्यांचे दावे खरे आहेत की नाही हे स्पष्ट होईल’, असंही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, आसाम पोलिसांनी CAA लागू होत असल्याबद्दल विरोधी पक्षांनी मोठा निषेध पुकारल्यानंतर त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये पक्षकारांना विरोध मागे घेण्याचे आणि राज्यात शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे ‘आदेश’ दिले आहेत, तसेच त्यांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर ‘कायदेशीर कारवाई’ केली जाईल असा इशारा दिला आहे.