माया वाघीण बेपत्ता झाली, वन्यजीव प्रेमींनी सुरू केले “सर्च माया” आंदोलन

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बऱ्याच पर्यटकांना दिसणारी ‘माया’ वाघीण बेपत्ता झाली असून तिचा अजून शोध लागलेला नाहीये. वन्यजीवप्रेमी यामुळे धास्तावले असून मायाचा शोध घेण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून माया वाघीण बेपत्ता असून तिचा शोध घेण्याचा वनविभागही प्रयत्न करत आहे.

माया वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध मोहिम हाती घेतली पण वनविभागाला त्यात यश आले नाही. ताडोबातील कर्मचारी व अधिकारी मायाच्या शोधासाठी परिश्रम घेत आहेत. माया ज्या परिसरात वावरते त्या परिसरात सध्या छोटी तारा व रोमा या दोन वाघिणी दिसत आहे. माया वाघिणीने आपला अधिवास बदलला असावा अशी शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.

मागील दोन महिन्यांपासून माया दिसत नसल्याने तिच्यासोबत काही बरेवाईट तर झाले नाही ना अशी शंका वन्यजीवप्रमेींच्या मनात निर्माण झाली आहे. चिमूर तालुक्यातील वन्यजीवप्रेमी यांनी कवडू लोहकरे यांच्या नेतृत्वात माया वाघीणीचा शोध घेण्यासाठी” सर्च माया” आंदोलन सुरू करण्यात आले आहे. डॉ.सुशांत इंदोरकर, मंगेश वांढरे,राहुल गहूकर,भुनेश वांढरे,हेमंत दडमल,रणजित श्रीरामे, राकेश धारणे,सुदर्शन बावणे , समिक्षा इंदोरकर यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे.