…ते पंडित कधीपासून झाले; छगन भुजबळ यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला

अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला. आता अजित पवारांचा गट एनडीएचा घटक पक्ष असून अजित पवार, प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा सदस्य म्हणून निवडणुका लढेल अशी चर्चा आहे. त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वकत्व्य केले. त्यावर छगन भुजबळ यांनी बावनकुळे यांना टोला लगावला. याआधी भुजबळ यांनी दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यांवरही केसरकरांना टोला लगावला होता. त्यामुळे भुजबळ यांच्या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार गटाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे कमळाचा प्रचार करतील. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर बावनकुळे म्हणाले, आम्हीसुद्धा शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्रचार करू.
चंद्रशेखर बावकुळे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत.

अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बावकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ म्हणाले की, बावनकुळेंना सगळं काही दिसतंय, त्यांना पुढचं दिसतंय. बावनकुळे पंडित कधीपासून झाले हेच मला काही कळत नाही. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, तसेच ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या गटाचा प्रचार करतील, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.