रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने खेळाडूंची फसवणूक

रेल्वे बोर्डावर सदस्य असून वरिष्ठ अधिकाऱयांशी चांगली ओळख आहे. स्वतःच्या शिफारशीवरून तो रेल्वेत कोणालाही नोकरी मिळवून देऊ शकतो, अशी बतावणी करीत सुशांत सूर्यवंशी या भामटय़ाने सहा कबड्डीपटूंना प्रत्येकी दोन लाखांचा चुना लावल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातरस्ता येथे राहणारे अनिल घाटे यांच्या तक्रारीवरून सूर्यवंशी याच्या विरोधात 12 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार आहे. किडवाई नगर येथे राहणाऱया सूर्यवंशीची कस्टममधून निवृत्त झालेले व सध्या अंकुर स्पोर्ट्स क्लब चालविणारे अनिल घाटे यांची एका सामायिक मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. तेव्हा सूर्यवंशी याने तो रेल्वे बोर्डावर सदस्य असून त्याची वरिष्ठ अधिकाऱयांशी चांगली ओळख आहे, त्याच्या शिफारशीवरून तो रेल्वेत सहज नोकरी मिळवून देऊ शकतो असे त्याने घाटे यांना सांगितले. रेल्वेत आता तिकीट तपासनीस व क्लार्कच्या जागा भरण्यात येणार असून त्याच्याकडे आठ मुलांचा कोटा असल्याचेही तो म्हणाला. प्रत्येकी आठ लाख भरावे लागतील असे सूर्यवंशी म्हणाला. त्यास घाटे यांनी होकार दिल्यावर सूर्यवंशीला 12 लाख रुपये देण्यात आले. पण पैसे मिळाल्यानंतर सूर्यवंशी याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. घाटे यांनी रेल्वेकडे चौकशी केली असता सुशांत सूर्यवंशी नावाची व्यक्ती रेल्वे नोकरीला नसल्याचे निष्पन्न झाले.