…तर छगन भुजबळ फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून कसे बसले; काँग्रेसचा सवाल

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची नावे संभाजी आणि शिवाजी अशी ठेवत नाहीत, असे भुजबळ म्हणाले होते. त्यांच्याया वक्तव्यानंतर त्यांच्यावर ब्राह्मण महासंघासह राजकीय पातळीवरून टीका होत आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनेही टीका करत त्यांना एक सवाल केला आहे. छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातला कमी बुद्धीचा माणूस आहे, अशी टीका काँग्रेसचे सोलापूरचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे. तसेच छगन भुजबळ यांना ब्राह्मण समाजाविषयी इतका आक्षेप होता तर मग ते देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे काय बसले असा सवालही त्यांनी केला आहे.

छगन भुजबळ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला कमी बुद्धीचा माणूस आहे. ज्या सावित्रीमाई फुले आणि ज्योतीराव फुले यांची नावे घेत त्यांनी राजकारण केले, त्यांचे साहित्यही छगन भुजबळ यांनी वाचलेले नाही. त्यांच्या नावे चुकीचा इतिहास भुजबळ सांगत आहेत. सावित्री माईंनी एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे काव्यफुले, या पुस्तकात त्यांनी शाळेला सरस्वतीचा दरबार असे म्हटले आहे. छगन भुजबळ हे नाकारणार आहेत का? त्यांचा अभ्यास किती? डिग्री किती याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. छगन भुजबळ हे सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले यांचे साहित्य नाकारण्याचे पाप भुजबळ करत आहेत मी त्यांचा धिक्कार करतो, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांचा ब्राह्मण समाजावरचा अभ्यासही कमी आहे. ब्राह्मण समाजातल्या अनेक मुलांची नावे ही शिवराय कुलकर्णी, संभाजी कुलकर्णी अशी आहेत.अनेक नावे तुम्हाला राज्यात आढळतील. भाजपचे शिवराय कुलकर्णी यांनी तर कुटुंबातल्या प्रत्येकाचे नाव छत्रपती शिवरायांच्या घराण्याला आदर्श मानून ठेवले आहे. भुजबळ यांना ब्राह्मण्या नावाचा रोग झाला आहे आणि त्यातूनच ते टीका करत सुटतात. माझा भुजबळांना इतकाच प्रश्न आहे की, ब्राह्मणद्वेष इतका होता तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसलात? तेव्हा सांगायचं होतं देवेंद्रजी तुम्ही ब्राह्मण आहात मी तुमच्या बाजूला बसणार नाही. सत्तेपुढे छगन भुजबळ लाचार झाले आहेत. त्यामुळेच राजकारणातला सर्वात कमी बुद्धीचा माणूस असे मी म्हटले, अशी टीकाही कुलकर्णी यांनी केली.