आपण ओबीसींसाठी शेवटपर्यंत लढणार – मंत्री छगन भुजबळ

chhagan-bhujbal

आपल्याला आमदारकी, मंत्री पदाची कुठलीही फिकीर नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढणार आहोत. त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण ओबीसी समाजाने एकत्र येऊन लढलं पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा आज नगर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ.महादेव जानकर,आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी,प्रा.लक्ष्मण हाके, सत्संग मुंडे, प्रा.पी टी चव्हाण,पांडुरंग अभंग, कल्याण दळे,शंकरराव लिंगे,दौलतराव शितोळे, डॉ.सुदर्शन घेरडे ,डॉ.स्नेहा सोनकाटे,जे.डी.तांडेल, आंधळे महाराज, मिननाथ पांडे, अरुण खरमाटे,अभय आगरकर, अनिल निकम, डॉ. नागेश गवळी, विशाल वालकर, भगवान फुलसुंदर,अंबादास गारुडकर यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

भाषणाच्या प्रारंभी ते म्हणाले की, गोरगरिबांना न्याय देणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री, आपल्या नाभिक समाजाचे स्व. कर्पूरीजी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो. हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना जाहीर करून देशासाठी, समाजासाठी काम करणाऱ्या ओबीसी समाजाचं ऋण त्यांनी मान्य केलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, इंग्रजांना सलग 14 वर्षे सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न देशाला दाखवणारे आमचा आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी देशासाठी फासावर गेले. फक्त रामोशी समाजाचेच नाही, तर ते देशाचे नाईक झाले. अशी अनेक नररत्न या समाजाने देशासाठी दिलेली आहेत. ही आमची लायकी असल्याचे सांगत लायकी काढणाऱ्यांचा समाचार घेतला. तसेच नगरला आल्यावर माझे जुने सहकारी, माजी मंत्री स्व. अनिलभैय्या राठोड यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. त्यांच्या समाजाची नगर शहरात अवघी 40-50 घरं असतील. पण ते 25 वर्षे आमदार होते. लढायला लागतं, रडून काही होत नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले.

ते म्हणाले की, खोटे पुरावे सादर करून कुणबी प्रमाण पत्र मिळवले जात आहे. असे खोटे प्रमाणपत्र जर दिले गेले तर आरक्षण ओबीसींचे सर्व आरक्षण संपुष्टात येईल हे सर्वांच्या लक्षात येत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंदिरा सहानी केसचा दाखला देत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आजवर सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत ते मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. झुंडशाहीने कोणी आरक्षण घेतले तर त्याला बाहेर काढले जाईल असे निवाडे असल्याचे अनेक दाखले त्यांनी दिले.

ते म्हणाले की, मराठा समाजाबाबत मसुदा निघाल्यापासून महाराष्ट्रामध्ये उन्माद केला जातोय ओबीसी लोकांना त्रास दिला जातोय. त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली जातेय. ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून मारहाण केली जात आहे त्रास दिला जात आहे. हे नेमक कशासाठी केल जातंय असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. तसेच ते म्हणता आहे की आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून गुलाल उधळत आहोत. जर तुम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला मग आता पुन्हा उपोषण का करताय असा टोला त्यांनी मनोज जरांगे यांना नाव न घेतला लगावला. तसेच ते तर आता अर्थसंकल्पातून आरक्षण मागत असल्याचा चिमटा देखील त्यांनी काढला.

ते म्हणाले की, आज आपले प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी समाजाने कुठल्याही दबावाला बळी न राहता एकत्र येऊन लढलं पाहिजे. आज ही वेळ ओबीसींवर आली आहे. उद्या ती दलित, आदिवासीवर देखील येईल त्यामुळे या लढ्यात ओबीसी बांधवांसोबत दलित आदिवासी बांधवानी देखील साथ महत्वाची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच बिहार आणि आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. त्यांना वेगळ आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. आता ओबीसी समाजासाठी ज्या योजना आहेत. त्या मराठा समाजाला लागू करण्यात येत आहे. या योजना केवळ मराठा समाजाला नाही तर इतर समाजालाही द्या असे सांगितले. ओबीसी समाजासाठी योजना आखताना निधी किती लागेल याचा विचार करून मग त्या मंजूर केल्या जात आहे. मात्र मराठा समाजाला देतांना तसा कुठलाही विचार होत नाही. नुसती मागणी झाली की लगेच निर्णय होतो असे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित करत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. मात्र प्रश्न करायचा आहे वाशीमध्ये तुम्ही जाहीर केलं मी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली होती ती मी पूर्ण केली. मग मला प्रश्न पडतोय की शपथ पूर्ण झाली तर आयोगाचा सर्वे कशाला? तपासणी करणारे लोक आपोआप माहिती भरतात. खोटं खोटं सुरू आहे. आरक्षण मिळाले तर हे कशासाठी? अनेक ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्र दिली जातात. तीनशे साठ कोटी रुपये खर्च यासाठी करत आहात का ? असे अनेक सवाल उपस्थित करत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते म्हणाले की, आपल्यावर अनेक प्रघात होत असतांना आपण अडीच महिने शांत बसलो काहीही बोललो नाही. आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही असे सांगत दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम या पंक्तीतून त्यांनी विरोधकांना इशारा दिला. जे आज माझा राजीनामा मागत आहे. त्यांना मला सांगयचे आहे की, १७ नोव्हेंबरला अंबड येथे पहिली जाहीर सभा झाली. सभेला जाण्यापूर्वीच आपण १६नोव्हेंबरला राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट करत ओबींसीसाठी शेवट पर्यंत लढणार असून ‘जीवन है संग्राम बंदे,ले हिमंत से काम’ असा एकच निर्धार आपण केला असल्याचे त्यांनी सांगितले.