सगळेच कुणबी झाले तर महाराष्ट्रात एकही मराठा उरणार नाही! भुजबळांनी पुन्हा काडी टाकली

राज्य सरकारने राज्यातील मराठय़ांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करणाऱ्या मराठा नेत्यांविरुद्ध अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यात सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी समाजामध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहेत, असे विधान करत भुजबळ यांनी पुन्हा काडी टाकली आहे. या विधानामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील आरक्षणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात जर सगळे मराठा कुणबी होणार आहेत तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा विधेयक आणा, काय फरक पडतो. पण बाहेर कोण राहणार आहे, हा खरा प्रश्न आहे. आयोगाचे लोकही राजीनामा देत आहेत. हा ओबीसी यांचा आयोग राहिला नाही. तो मराठय़ांचा आयोग झाला आहे, असा गंभीर आरोपही भुजबळ यांनी केला.

मनोज जरांगे-पाटील माझ्याविरोधात बोलतो. कारण, त्याशिवाय त्याचं भाषण कुणी ऐकणार नाही, असा एकेरी उल्लेख त्यांनी केला. हरिभाऊ राठोड गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत, असा आरोपही भुजबळ यांनी केला.

सध्या दादागिरीने कुणबी प्रमाणपत्र दिली जात असून ती खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. तसेच यापुढेही होणार आहे. जात पडताळणीच्या वेळीही दादागिरीच होणार आहे. हे लोक दादागिरी करणार आणि अशीच प्रमाणपत्रे घेतील. ओबीसींवर चर्चा घेऊन काय करायचे?, आता सगळेच मराठा ओबीसी होणार आहेत. त्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत. न्यायमूर्ती शिंदे गावागावात फिरून हे करा ते करा असे सांगत सुटले आहेत. त्यामुळे आता सगळे ओबीसी होणार असल्याने महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाहीत, असे भुजबळ म्हणाले.