छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटवण्यावरून तणाव, पोलिसांवर दगडफेक; अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्तासह दहा कर्मचारी तसेच महापालिकेचे इमारत निरीक्षक व इतर तीन कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडत नागरिकावर लाठी हल्ला केला. जमाव पांगवल्यानंतर महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली.

महापालिकेच्या 1975 चा विकास आराखड्यात शिवाजीनगर ते रामनगर असा 80 फुटाचा रस्ता नमूद केला आहे. या रस्त्यावर विश्वकर्मा चौक ते झेंडा चौक दरम्यान वीस बाय तीस आकाराचे प्लॉटिंग टाकून अनेकांना विक्री करण्यात आली होती. या ठिकाणी छोटे-मोठे पत्राची घरे तयार करून अनेकजण राहतात. नऊ वर्षांपूर्वी याठिकाणचे अतिक्रमणे काढण्याचा महापालिकेने प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी ही कारवाई अर्ध्यावर राहिली. दरम्यान सिडको उड्डाणपूल नजीक गॅस टँकरचा अपघात झाल्यानंतर प्रशासक जी. श्रीकांत यांनी जालना रोडला समांतर असलेले रस्ते करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या रस्त्यावरील मालमत्ता धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना घरे रिकामी करण्यासाठी 72 तासाचा वेळ देण्यात आला होता. हा वेळ बुधवारी संपल्यामुळे सकाळी दहा वाजता अतिक्रमण हटाव विभागाचे पथक, मुकुंदवाडी पोलिसांचे पथक या ठिकाणी आले. पथक पाहताच 200 ते 300 नागरिकांचा जमाव याठिकाणी जमा झाला. त्यांनी सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कारवाई करू नका, आम्हाला मोबदला दिल्याशिवाय आम्ही जागा रिकाम्या करून देणार नाही, अशी मागणी करत कारवाईला विरोध केला. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे दिली जातील, दहावी-बारावी परीक्षा असल्यामुळे कारवाई थांबविता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे तणाव वाढला. त्यानंतर नागरीक, महिलांनी पोलीस, महापालिकेच्या पथकाच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली. त्यात सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील,पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यासह आठ ते नऊ पोलीस कर्मचारी दगड लागून जखमी झाले. महापालिकेचे इमारत निरीक्षक रामेश्वर सुराशे यांच्या चेहऱ्यावर दगड लागला. त्यामुळे जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर लाठीमार सुरू करण्यात आला. त्यामुळे जमाव पांगला कारवाई सुरू केली. दिवसभर ही कारवाई सुरू राहणार आहे.

आक्रोश आणि धावाधाव

सुमारे दोनशे ते सव्वादोनशे घरांवर ही कारवाई होणार आहे. या भागात हातावर पोट असलेले सर्वसामान्य नागरिक राहतात. महापालिकेची कारवाई सुरू होताच संसार वाचवण्यासाठी त्यांची पळापळी सुरू झाली. सर्वत्र आक्रोश सुरू होता. लहान मुले महिला अक्षरक्षः डोळ्यातून अश्रू गाळत आपला संसार वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची विदारक चित्र यावेळी होते.