गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची घटना गोव्यात उघडकीला आली आहे. गोव्याच्या म्हापसा परिसरात सोमवारी हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना रविवारी उत्तररात्री घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. म्हापसा येथे बसवण्यात आलेला शिवरायांचा तीन फूट उंचीच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड करणारा अद्याप अज्ञात आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 153अ आणि 427 अंतर्गत म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

स्थानिकांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे. हा पुतळा ग्लास फायबरपासून बनवण्यात आला आहे. त्याची तोडफोड करण्यासाठी धारदार शस्त्र किंवा काठीचा वापर करण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच, स्थानिक शिवप्रेमींनी तिथे नवीन पुतळा बसवण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वलसान यांच्या म्हणण्यानुसार, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात येत आहे, जेणेकरून या हल्लेखोराचा माग काढता येईल, असं वलसान म्हणाले आहेत. तर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशा प्रकारच्या घटना समाजात अशांतता पसरवण्यासाठी केल्या जात असल्याची प्रतिक्रिया देली आहे.