स्थलांतरित बिगर मुस्लिमांना नागरिकत्व देणारा ’सीएए’ मार्चपासून

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देणारा सीएए कायदा मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून लागू होण्याची शक्यता आहे. सीएए लागू करण्यासाठी सरकारने एक पोर्टलही तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 31 डिसेंबर 2014 पर्यंत हिंदुस्थानात स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत नागरिकत्व देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने याबाबतचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने कायद्याबाबतचे नियम तयार असून त्याबाबत ऑनलाइन पोर्टलही तयार करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. अर्जदारांनी प्रवासी कागदपत्रांशिवाय हिंदुस्थानात प्रवेश केल्याचे वर्ष नागरिकत्वासाठी अर्ज करताना नमूद करावे असे सूचित करण्यात आले आहे. तसेच पुराव्यादाखल अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.