पक्ष कार्यालयावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांत धुमश्चक्री

नाशिकमधील राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला.

नाशिक-मुंबई महामार्गावर मुंबई नाका येथे जिह्याचे कार्यालय असलेली राष्ट्रवादी भवन ही इमारत आहे. मंगळवारी सकाळी राष्ट्रवादीचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, समता परिषदेचे दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक यांनी तेथे ठाण मांडले. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी भुजबळ समर्थक राष्ट्रवादीचे मोजके कार्यकर्ते हजर होते.

दुपारी शरद पवार समर्थक असलेले नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी नगरसेवक सुरेश दलोड हे समर्थकांसह या कार्यालयाजवळ हजर झाले. बैठक घेण्यासाठी आत जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पोलिसांनी अडविले. अजित पवार, छगन भुजबळ समर्थकांनी घोषणाबाजी करीत त्यांना अडविले. यानंतर गोंधळ व तणाव निर्माण झाला. पोलिसांनी बळाचा वापर करून शरद पवार यांचे समर्थक शेलार, आव्हाड व कार्यकर्त्यांना रोखले. यानंतर या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. राष्ट्रवादी भवन राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून निर्माण केले आहे. यामुळे कायदेशीररीत्या कार्यालयावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचाच हक्क आहे, असे गजानन शेलार यांनी सांगितले.