प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी मुलीच्या लैंगिक शोषणाची तक्रार; हायकोर्टापुढे उघडकीस आले महिलेचे कारस्थान

प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी महिलेने स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केली. ही बाब गांभीर्याने विचारात घेत उच्च न्यायालयाने ‘पोक्सो’च्या गुह्यातील तरुणाला जामीन मंजूर केला. महिलेने मुलीच्या कथित लैंगिक शोषणाची तक्रार करताना स्वतःचे आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याची वस्तुस्थिती लपवून ठेवली. त्यामुळे संशय निर्माण होत असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

पुणे जिह्यातील पाच वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून 25 वर्षीय ऋषिकेश गिरी याला लोणी पुंभार पोलिसांनी 31 जुलै 2022 रोजी अटक केली होती. आपल्यावर खोटा आरोप करून ‘पोक्सो’च्या गुह्यात अडकवण्यात आल्याचा दावा करीत ऋषिकेशने अॅड. सत्यम निंबाळकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली होती. त्याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी निर्णय दिला. ऋषिकेश आणि तक्रारदार महिलेचे प्रेमसंबंध होते. याचदरम्यान ऋषिकेशचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरले व त्याचा महिनाभरात साखरपुडा होणार होता. त्याचे निमंत्रण तक्रारदार महिलेला पाठवले होते. त्यावर महिलेने त्याला लग्नानंतरही संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र ऋषिकेशने त्याबाबत नकार दिला होता. त्याच राग काढत महिलेने ऋषिकेशला ‘पोक्सो’च्या गुह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली. ही तक्रार करताना तिने ऋषिकेशशी स्वतःचे असलेले प्रेमसंबंध लपवून ठेवले. यावरून ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत आरोपाबाबत संशय निर्माण होत असल्याचा युक्तिवाद अॅड. सत्यम निंबाळकर यांनी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आणि सरकारी पक्ष व महिलेतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद अमान्य करीत न्यायालयाने तरुणाची जामिनावर सुटका केली.