दिल्लीत कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, यूपी बिहारसह राजस्थानमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढले

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केले असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. मागच्या पंधरा दिवसात दिल्लीत 459 कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. जी गेल्या दोन पंधरवड्यात 191 आणि 73 होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या राज्यात मागील 15 दिवसांत 226 प्रकरणे आढळून आली आहेत जी मागील दोन पंधरवड्यांमध्ये अनुक्रमे 96 आणि 27 होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. सध्या चाचण्या कमी होत असल्या, तरी खरी आकडेवारी कितीतरी जास्त असेल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

दिल्लीतील कोरोनाचे दैनंदिन आकडे मे 2023 मध्ये शेवटचे पाहिले गेले होते, त्यावेळी कोरोनाची प्रकरणे कमी होऊ लागली आणि मार्चच्या मध्यात आणि एप्रिल 2023 मध्ये 12,500 वर पोहोचली. यानंतर, डिसेंबर-जानेवारीच्या हिवाळ्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली मात्र ही संख्या खूपच कमी होती. 20 डिसेंबर 2023 रोजी, संपूर्ण देशात दैनंदिन संख्या सुमारे 841 होती, त्या वेळी बहुतेक संक्रमण दक्षिण हिंदुस्थानात दिसले होते जे केरळमध्ये सर्वाधिक होते. आता दोन महिन्यानंतर उत्तर हिंदुस्थानात या व्हायरसचा स्पाइक पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि राजस्थानबरोबरच उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही कोरोनाची प्रकरणं वाढली आहेत. 20 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान उत्तर प्रदेशात फक्त 12 प्रकरणे होती, नंतर 4 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान हा आकडा 36 वर नोंदवला गेला, मात्र 19 फेब्रुवारीपासून कोविडची प्रकरणे 164 वर पोहोचली तेव्हा चिंतेची बाब होती. त्याचप्रमाणे, बिहारमध्ये गेल्या पंधरवड्यात केवळ 14 कोरोना रुग्ण होते, जे आता गेल्या 15 दिवसांत 103 वर पोहोचले आहेत.

कर्नाटकात अलीकडे कोरोनाची प्रकरणे वाढली होती मात्र आता ती कमी होत आहेत, गेल्या दोन पंधरवड्यात ही संख्या 959 वर पोहोचली होती, मात्र गेल्या 15 दिवसांत ती 268 वरच आहे. महाराष्ट्रात गेल्या 3 पंधरवड्यात कोरोनाची प्रकरणे संथ गतीने वाढली आहेत, ती अनुक्रमे 466, 555 आणि 496 होती. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना प्रकरणांमध्ये एवढी कमी वाढ ही चिंतेची बाब नाही, विशेष करुन जेव्हा विषाणूचे नवीन प्रकार समोर आलेले नाहीत.