शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. पेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू झाल्यापासून शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहे. गेल्याचवर्षी शिक्षणमंत्र्यांनी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, असे जाहीर केले होते. या धोरणाची अंमलबजावणी कधीपासून होणार याविषयी शिक्षणमंत्र्यांनी आता माहिती दिली आहे.

विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी दोन्ही वेळा उपस्थित राहिल्यास कोणत्याही एका परीक्षेत मिळालेले त्यांचे सर्वोत्तम गुण अंतिम मानले जातील, अशी माहितीही धर्मेंद्र प्रधान यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे एक उद्दिष्ट विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे हा आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून दहावी, बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची मानसिकता तयार होईल. शिवाय नापास झाल्यानंतर खचून न जाता परीक्षा देण्याची दुसरी संधी त्यांना उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.