अजित पवार गटात नाराजी? सत्तेत वाटा मिळत नसल्यानं काही आमदार वेगळ्या भूमिकेच्या तयारीत असल्याची चर्चा

अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सत्तेत सहभागी झाला आहे. मंत्रिपदाची आशा असलेले अनेक जण या वाटेवर गेले. मात्र आठवडा झाला तरी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांनाच अजून खाती मिळालेली नाही. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराची केवळ चर्चाच होत असून तशी काही चिन्ह लवकर दिसत नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या गटात गेलेले काही नेते नाराज आहेत. यामध्ये तीन नावांची चर्चा आहे.

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार अजित पवार गटातील नेत्यांची नाराजी आहे. यापैकी तीन नेते तटस्थ भूमिका घेण्यासाठी तयार असल्याचं बोललं जात आहे. माणिकराव कोकाटे, अतुल बेनके, किरण लहामटे हे तीन आमदार असल्याचं बोललं जात असल्याचं टीव्ही 9 मराठीच्या वृत्तात म्हटलं आहे.