वारसा वैभव – जागतिक वारसा संकल्पना आणि विस्तार

>> डॉ. मंजिरी भालेराव

‘वारसा’ या शब्दाचा संबंध फक्त कौटुंबिक ठेव किंवा संपत्ती याच विषयाशी आहे असा सर्वसामान्य समज असतो. काही वेळेस मूर्त वस्तूंचा किंवा वस्तूंचा समावेश ‘वारसा’ या संज्ञेत होतो. तसेच क्वचित काही वेळेस अमूर्त स्वरूपातील रूढी, परंपरा, सण इत्यादींनासुद्धा ‘वारसा’ म्हटले जाते. इ.स.च्या 20 व्या शतकाच्या शेवटी शेवटी वारसा या संज्ञेच्या संकल्पनेचा बराच मोठा विस्तार झालेला पाहायला मिळतो.

‘वारसा’ या शब्दाची एका ओळीत व्याख्या देणे अवघड आहे. खरे तर ‘वारसा’ या शब्दाच्या अनेक व्याख्या होऊ शकतात. एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे जो येतो तो वारसा. त्यामध्ये वास्तू, वस्तू, मूल्य, सांस्कृतिक परंपरा, इतिहास, कथा, कहाण्या, जमीनजुमला, गुरे-ढोरे इ. आणि अशा प्रकारच्या इतर अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे पिढय़ान्पिढय़ा काही विशिष्ट गोष्टी काही घराण्यांमध्ये चालत आलेल्या आढळतात. त्यामुळे यात मुख्यत वारसदार, आनुवंशिकता, परंपरा या संकल्पना अंतर्भूत आहेत, परंतु एक लक्षात ठेवले पाहिजे की, वंशपरंपरेने जे जे काही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले आहे, ते सर्व ‘वारसा’ या संकल्पनेमध्ये अंतर्भूत करता येईल असे नाही. याचे कारण वडिलोपार्जित संपत्ती, घरदार, काही वस्तू-वास्तू या जरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या तरी त्याचे महत्त्व त्या कुटुंबापुरतेच मर्यादित न राहता सगळ्या गावाला महत्त्वाचे वाटते. तेव्हा तो वारसा जरी एका कुटुंबाचा असला तरी तो स्थानिक वारसा म्हणून गणला जाऊ शकतो, परंतु वारसा म्हणजे एवढेच नसते. त्याचे अनेक प्रकार असतात. ते नेमके कोणते हे आपण आता पाहू.

ज्या स्थळांना सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्व आहे, तसेच त्यासारखे दुसरे स्थळ निर्माण करता येणे शक्य नाही आणि एखाद्या ठरावीक प्रदेशाच्या किंवा मानवजातीच्या इतिहासामध्ये त्याचे  अनन्यसाधारण महत्त्व आहे, अशा गोष्टींना जागतिक वारसा स्थळ म्हणून संबोधले जाते. ते स्थळ हे फक्त त्या प्रदेशाचाच नाही तर अखिल मानवजातीचा वारसा म्हणून घोषित केले जाते. युनेस्को (United Nation`s Educational Scientific and Cultural Organization – UNESCO) ही जागतिक स्तरावरील संस्था हा दर्जा देण्याचे काम करते. 1954 साली इजिप्त सरकारने नाईल नदीवर नवीन उंच आस्वान धरण बांधण्याचा निर्णय घेतला. या बांधकामाचा परिणाम असा होणार होता की, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्राचीन इजिप्त आणि प्राचीन नुबियामधल्या अनेक महत्त्वाच्या आणि भव्य वास्तू पाण्याखाली जाणार होत्या. त्या वेळेस इजिप्त आणि सुदान या देशांनी युनेस्कोच्या संचालकांना या वास्तूंना वाचवण्यासाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यासंबंधी युनेस्कोने जगातल्या देशांना आवाहन करून एक मोठी मोहीम हातात घेतली. त्यामध्ये शेकडो स्थळांचे उत्खनन, हजारो वस्तूंचे जतन, तसेच अनेक महत्त्वाच्या वास्तूंची  उंचावर नेऊन त्यांची पुनर्बांधणी अशा गोष्टी घडून आल्या. 1980 साली हे काम पूर्ण झाले आणि त्यानंतर जगातल्या इतर अनेक देशांनी अशा प्रकारे युनेस्कोच्या मदतीने आपापल्या देशातील वारशाचे जतन आणि संरक्षण केले. दरम्यान, जगातल्या अनेक देशांनी एकमताने यासंबंधीचा एक करारनामा  तयार केला आणि तो 17 डिसेंबर 1875 पासून लागू झाला. जगातल्या आत्यंतिक महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करून ती मानवजातीसाठी संरक्षित करण्यासाठी यानुसार तरतूद करण्यात आली.

आत्यंतिक महत्त्वाचे  मूल्य असणाऱया स्थळांना ‘जागतिक वारसा स्थळ’ असा दर्जा देण्यात येऊ लागला. असा दर्जा सांस्कृतिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक तसेच नैसर्गिक यांचे मिश्रण असलेल्या मिश्र स्थळांना देण्यात येतो. अशा प्रकारचा जागतिक वारसा ज्या वास्तूला  मिळतो, तिथे युनेस्कोतर्फे एक शिलालेख कोरला जातो. त्यामध्ये त्या वास्तूला जागतिक वारसा असा दर्जा का मिळाला याची कारणमीमांसा दिलेली असते आणि खालील चिन्ह कोरलेले असते.

जागतिक वारसा जसा असतो तसा राष्ट्रीय आणि स्थानिक वारसाही प्रत्येक देशात पाहायला मिळतो. सर्व जगाला वेड लावणाऱया हिंदुस्थानी संस्कृतीची आणि वारशाची ओळख करून घेण्यासाठी निरनिराळ्या देशांमधून प्रवासी इथे येतात, पण हिंदुस्थानातील लोक मात्र स्वतच्या देशाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास करताना फारसे दिसत नाहीत. इतिहास हा विषय मनोरंजकही असू शकतो. आपल्या इतिहासाची माहिती घेण्यासाठी विविध साधनांचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करून प्राचीन काळाचे एक चित्र डोळ्यांसमोर येते. या साधनांमध्ये अतिशय महत्त्वाची साधने आहेत ती – प्राचीन साहित्य (धार्मिक तसेच लौकिक) आणि परकीयांच्या प्रवासवर्णनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे प्राचीन शिलालेख, ताम्रपट, नाणी, मंदिरे, लेणी तसेच पूर्वीच्या लोकांच्या वस्तीच्या ठिकाणांची उत्खनने यांचा समावेश होतो. यापैकी अनेक गोष्टी या प्रत्यक्ष बघून, हाताळून समजून घ्याव्या लागतात. त्यानंतर या विषयाचे खरे स्वरूप समजते. यापैकी शेकडो वर्षांपूर्वीची ही प्राचीन स्थळे, गुहा, मंदिरे इत्यादी पाहण्यासाठी जगभरातून लोक हिंदुस्थानात येतात तेव्हा थक्क होतात. जगातील वारसा या दर्जामुळे अनेक देशांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठी सुधारणा झालेली आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विविध प्रांतांतील लोकांसाठी आपला आर्थिक स्तर उंचावण्याची एक मोठी संधीच उपलब्ध होते. त्यासाठी लोकांमध्ये याविषयीची जाणीव आणि जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामध्ये 18 एप्रिल रोजी ‘जागतिक वारसा दिन’ साजरा करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे दरवर्षी या दिवशी वारसाविषयक जागृती लोकांमध्ये पसरेल हे पाहणे आवश्यक ठरते. त्यातूनच त्यांचा शाश्वत विकास होणार आहे.

[email protected]

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत आणि भारतीय विद्या विभागप्रमुख आहेत.)