केजरीवालांच्या खासगी सचिवासह आप नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे

दिल्लीमध्ये विविध ठिकाणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED RAID) छापेमारी केली आहे. केजरीवाल यांची खासगी सचिव विभव कुमार आणि राज्यसभेचे खासदार एन.डी.गुप्ता यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. दिल्ली पाणी बोर्ड घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये एकाचवेळी 12 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.

दिल्ली पाणी बोर्डाच्या टेंडर प्रक्रियेत आर्थिक घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. सीबीआय आणि दिल्ली पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, त्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल करतेवेळी म्हटले होते की इलेक्ट्रोमॅग्नेटीक मीटर बसवणे, त्याची तपासणी करणे आणि त्यासाठीचे टेंडर देताना एका विशिष्ट कंपनीला त्याचा लाभ मिळेल असे काम केले होते.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, दिल्ली पाणी बोर्डाचे तत्कालीन मुख्य अभियंता जगदीश कुमार अरोरा यांनी मेसर्स एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला 38 कोटी रुपयांच्या निविदेअंतर्गत काम दिले होते, ही कंपनी निकषांवर खरी ठरली नव्हती. ईडीने काही मनी लाँड्रींगला आळा घालण्यासाठीच्या कायद्याअंतर्गत पाणी बोर्डाचे तत्कालीन मुख्य अभियंता जगदीश कुमार अरोरा आणि अनिल कुमार अग्रवाल यांना 31 जानेवारीला अटक केली होती.

एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बनावट कागदपत्रे सादर करून निविदेत बाजी मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेसर्स एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने अनिल कुमार अग्रवाल यांच्या मालकीच्या मेसर्स इंटिग्रल स्क्रूस लिमिटेड या कंपनीला काम दिले होते.

अनिल अग्रवाल यांना टेंडरची रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी सुमारे 3 कोटी रुपयांची लाच रक्कम जगदीश कुमार अरोरा यांना दिल्याचा आरोप आहे. लाचेची रक्कम बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी अरोरा यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांचा वापर करण्याचा आल्याचा आरोप आहे.