‘जेल का जवाब व्होट से’ म्हणायला घातली बंदी, आपच्या प्रचार गीतावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

‘जेल के जबाब में हम व्होट देंगे…’ म्हणण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. आपच्या प्रचार गीतातील ही ओळ बदलण्याचे फर्मान आयोगाने काढले आहे. आवश्यक त्या सुधारणा केल्यावर हे प्रचार गीत पुन्हा प्रमाणपत्रासाठी सादर करावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

या गाण्यातील घोषवाक्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा वारंवार येणारा उल्लेख एक प्रकारे न्यायव्यवस्थेवर आक्षेप घेतो. यामुळे आयोगाच्या निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचे आणि जाहिरात संहितेचे उल्लंघन होत आहे, असा तर्क निवडणूक आयोगाने प्रचार गीतावर आक्षेप घेताना काढला आहे.

मार्चमध्ये केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. ‘आप’ने असा दावा केला आहे की, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले कारण भाजपने सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करावा अशी त्यांची इच्छा नव्हती. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले.

ईडी, सीबीआयने कारवाई केलेले इतर राजकीय नेते भाजपमध्ये सामील होताच त्यांच्यावरील खटले बंद केले जातात तेव्हा आयोग त्याला आक्षेप घेत नाही, परंतु जेव्हा आम्ही आमच्या प्रचार गीतात याचा उल्लेख करतो तेव्हा आयोग त्याला आक्षेप घेतो. याचा अर्थ भाजपचे हे हुकूमशाही सरकार आहे, असे आयोगालाही वाटते, असे अतिशी म्हणाल्या.

प्रचार गीताला आक्षेप का?

अरविंद केजरीवाल यांचे पह्टो, पोस्टर हातात धरून, ‘जेल के जवाब में हम वोट देंगे’ हे वाक्य वारंवार म्हणणारा एक आक्रमक जमाव या गीताच्या व्हीडीओत दिसतो. केजरीवाल यांना या व्हीडीओत गजाआड दाखवले आहे. असे चित्रण आणि वाक्य म्हणजे न्यायव्यवस्थेवर आक्षेप होतो, असे आयोगाने म्हटले आहे.

हे भाजपचे षडयंत्र

निवडणूक आयोगाने आपच्या प्रचार गीतावर बंदी घातल्याचा दावा आप नेते आतिशी यांनी केला. निवडणूक आयोगाची कारवाई हे भाजपने उगारलेले आणखी एक राजकीय हत्यार असल्याचे त्या म्हणाल्या. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाच्या प्रचार गीतावर बंदी घातली आहे, असा दावा त्यांनी केला.