Lok Sabha Election 2024 : PM मोदी, राहुल गांधींनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप; ECI ने बजावली नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांचा धुरळा उडतोय. निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणूक रंगत असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस बजावली आहे.

धर्म, जात, समाज आणि भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट पाडण्याचे आरोप भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर करत आहेत. या जातीय वक्तव्यांप्रकरणी आता भाजप आणि काँग्रेसला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. दोन्ही पक्षांना या प्रकरणी 29 एप्रिल सकाळी 11 पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने नोटीसमध्ये दिले आहेत.

लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 77 नुसार दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी उत्तर सादर करावं, असं आयोगाने म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची खासकरून स्टार प्रचारकांच्या वर्तनाची पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी. उच्चपदस्थ नेत्यांच्या भाषणांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

Quota for Muslims: पंतप्रधान मोदी बोलून फसले, त्यांच्याच मित्र पक्षाने केली होती अंमलबजावणी; सत्य उघड

काँग्रेसने दिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या नोटीसवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही निवडणूक आयोगात तक्रार केली होती. भाजप प्रचारात धर्माचा आधार घेत दुरुपयोग करत आहे. हे चिंताजनक आहे. यामुळे आम्ही या नोटीसला उत्तर देऊ, असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे.