धनाची देवता

55

योगेश नगरदेवळेकर, [email protected]

कोकणात बऱयाचदा हत्ती केळय़ाच्या बागांची नासधूस करतात. मूळचाच बुद्धिमान आणि अत्यंत शांत असलेला हा गजराज असे का करत असावा….

हत्ती या महाकाय प्राण्याबाबत मानवाला पुरातन काळापासून आश्चर्य वाटत आले आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावर या प्राण्यालासुद्धा प्रशिक्षण देऊन पाळायला सुरुवात केली. अर्थातच हत्तीचा आहार प्रचंड असल्याने त्याला पाळण्यासाठी त्याचा खर्च करू शकेल अशा माणसांकडेच हत्ती पाळले गेले. किंबहुना, दारात हत्ती झुलत असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. श्रीमंतीबरोबरच तो सामर्थ्याचेही प्रतीक असल्याने राजेरजवाडे यांच्या ताफ्यात दिसू लागला. त्याच अर्थाने तो धनाची देवता लक्ष्मीचे वाहन बनला.

जंगलातील हत्ती हा कळपाने राहणारा प्राणी आहे. अतिशय बुद्धिमान आहे. त्याचे आकारमान प्रचंड नसल्याने त्याची भूक पण तशीच आहे. गवत, झाडपाला हे त्याचे खाद्य हे विपुल प्रमाणात जिथे उपलब्ध असेल तिकडे त्याचे अस्तित्व असते. एवढय़ा प्रचंड प्रमाणातील आहारासाठी स्थलांतर ही त्याची नित्याची गोष्ट आहे. एका ठिकाणचे खाद्य संपल्यावर तो पुढे पुढे सरकत राहतो. कालांतराने पुन्हा तिथे येतो. तोपर्यंत तेथील गवत व झाडोरा पुन्हा वाढलेला असतो. त्यामुळे नैसर्गिकरीत्या जंगलाचे संतुलन राखले जाते.

नेहमीप्रमाणे मानवाने या नैसर्गिक चक्रामध्ये ढवळाढवळ केली. कर्नाटकातील ज्या भागात हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे त्या जंगलाची अपरिमित तोड करण्यात आली. त्यात भर म्हणून की काय, स्थानिक झुडपांच्या ऐवजी घाणेरी व रानमोडी या वनस्पतींच्या बेसुमार वाढीमुळे हत्ती व तृणभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले. याचा परिणाम म्हणजे हे दक्षिणेतील हत्ती अन्नाच्या शोधात उत्तरेकडे सरकू लागले आणि महाराष्ट्रात  दाखल झाले. सिंधुदुर्ग जिह्यात जंगल उत्तम असल्याने २००२ पासून हत्तींचा वावर महाराष्ट्रात होऊ लागला.

सिंधुदुर्गमध्ये हे हत्ती अन्न व पाण्याच्या शोधात फक्त जंगलात असते तर प्रश्न नव्हता, परंतु जंगलाला लागून असलेल्या लहान वस्त्या आणि शेते यात ते घुसले आणि माणूस आणि हत्ती यातील संघर्ष सुरू झाला. स्थलांतर करता करता हत्ती नजीकच्या वनक्षेत्रात राहतात, पण रात्र झाली की, सहजपणे उपलब्ध असलेल्या केळीच्या आणि माडांच्या बागा फस्त करतात. आता तर ते भातकणगी फोडून त्यातील भात खाण्यापर्यंत गेले आहेत.

त्यांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न वनविभागातर्फे चालूच आहेत, पण हा प्राणी एका वनक्षेत्रात स्थिर राहू शकत नसल्याने एका विशिष्ट क्षेत्रात त्याचा बंदोबस्त करणे हे तात्पुरते उपाय ठरतात. हत्ती हा प्राणी समाजप्रिय आणि कळपाने राहणारा असतो. आपल्या पिल्लांप्रति तो अधिक संवेदनशील असतो. त्यांना धोका आहे असे त्याला वाटल्यास तो अनिर्बंधपणे हल्ला चढवतो. एखाद्या ठिकाणी निसर्गात ढवळाढवळ केल्याचा दुसऱया ठिकाणी कसा विपरीत परिणाम होतो याचे हत्तींचे दक्षिणेतून उत्तरेत स्थलांतर हे उत्तम उदाहरण आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या