तोतया पीएसआयला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

शहरात गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय म्हणून नियुक्तीस असल्याचे सांगत विविध पोलीस ठाण्यांमध्ये राबता ठेवणाऱ्या एका तोतयाला गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर बेडय़ा ठोकल्या.

सतीश काशिनाथ जोजे (रा. सावेडी, नगर) असे या तोतया पीएसआयचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना माहिती मिळाली. नगर शहरात एक तोतया पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पोलीस अधिकाऱयाचा गणवेश घालून वावरत आहे, या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर शहरातील सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील वस्तीत हा तोतया राहत असल्याचे पोलीस पथकास आढळले.

पोलिसांनी सापळा लावून सतीश जोजे याला ताब्यात घेतले असता, त्याच्या घरात पोलीस अधिकाऱयाचे साहित्य आढळून आले. सतीश जोजे पोलीस अधिकारी असल्याचे पुरावे तो देऊ शकला नाही. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो संभाजीनगर जिह्यातील गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.नगरमधील एलसीबी, कंट्रोल रूम, ट्रफिक शाखा, एमआयडीसी पोलीस ठाणे या ठिकाणी नियुक्ती असल्याचे तो सांगत होता.