मालेगावात 113 क्विंटल कांद्याचे मोल 252 रुपये 50 पैसे

कांद्याचे भाव मातीमोल झाल्याने शेतकऱयांना दिलासा म्हणून शासनाने जाहीर केलेली अनुदान योजना फसवी ठरली आहे. 113 क्विंटल कांदा विक्रीच्या बदल्यात 39 हजार 515 रुपये अनुदान मिळणे अपेक्षित असताना मालेगावचे चिंचावड येथील शेतकरी सतीश निंबा गुंजाळ यांच्या खात्यावर अवघे 252 रुपये 50 पैसे अनुदान जमा झाले आहे. शासनाकडून झालेल्या या क्रूर चेष्टेने ते संतप्त झाले आहेत. अनुदानाची पूर्ण रक्कम न मिळाल्यास जिल्हाधिकाऱयांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मालेगावजवळील चिंचावड येथील शेतकरी सतीश निंबा गुंजाळ यांनी सरासरी 700 रुपये प्रतीक्विंटल दराने बाजार समितीत 112 क्विंटल 90 किलो कांदा विकला. यात त्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. साडेतीनशे रुपये प्रतीक्विंटल दराने अनुदान देण्याची घोषणा मिंधे-फडणवीस सरकारने केली. याप्रमाणे या शेतकऱयाचा अनुदानाचा प्रस्ताव सादर झाला. शासन घोषणेप्रमाणे त्यांना एकूण 39 हजार 515 रुपये इतके अनुदान मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गुंजाळ यांच्या बँक खात्यावर अनुदानाची अवघी 252 रुपये 50 पैसे इतकीच रक्कम जमा झाली.

ही तर चेष्टा, आत्मदहन करणार

तुटपुंजे अनुदान देऊन शासनाने माझी एकटय़ाचीच नव्हे, तर समस्त शेतकरी बांधवांची चेष्टा सुरू केली आहे. याबाबत मी मंत्री दादा भुसे, सहकार उपनिबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी, तहसीलदार, सर्व संबंधितांकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेवून अनुदानाची पूर्ण रक्कम येत्या काही दिवसात मिळाली नाही, तर मी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात आत्मदहन करीन, असा इशारा  सतीश गुंजाळ यांनी दिला.

वडील अंथरुणाला खिळून

शासनाकडून चेष्टा झालेले शेतकरी सतीश गुंजाळ यांनी कुटुंबाची हालाखीची परिस्थितीच विशद केली. अवघी तीन एकर शेती आहे. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने आमचे कुटुंब तिथे रात्रंदिवस काबाडकष्ट करते. वृद्ध वडिलांना अर्धांगवायू झाल्याने ते अंथरुणाला खिळून आहेत, त्यांच्याही उपचाराचा खर्च करावा लागतो. कुटुंब सांभाळताना हालअपेष्टा होतातच. शेतीवर निसर्गाची अवकृपा सतत सुरूच असते. आता तर शासनानेही चेष्टा करून फटके दिले आहेत, असे गुंजाळ यांनी सांगितले.

कुठल्याही योजनेचा लाभ नाही

माझे नाव लाभार्थ्यांच्या यादीत येतं, पण आजपावेतो मला कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही. पीकविम्याचा एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. शेतकऱयांची बाजू कोण धरणार, असा सवाल करीत ते म्हणाले, माझ्यासारखे अनेक अन्यायग्रस्त शेतकरी सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत.

त्यांना पन्नास कोटी, पण शेतकऱयांसाठी काहीच नाही

सतीश गुंजाळ यांनी सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. ते म्हणाले, यांच्याकडे त्यांना अर्थात मिंधेंच्या फुटीर आमदारांना द्यायला पन्नास-पन्नास कोटी रुपये आहेत, पण शेतकऱयांसाठी काहीच नाही. मला अवघे 252 रुपये 50 पैसे अनुदान कोणत्या हिशोबाने दिले, असा खडा सवालच त्यांनी सरकारला केला.