गोखले-बर्फीवाला पुलाचे जोडकाम सुरू; तीन महिन्यांत काम पूर्ण करणार

अंधेरीच्या गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पुलाच्या जोडणीच्या कामाला मुंबई महापालिकेने रविवारी सुरुवात केली. हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

गोखले पुलाच्या कामांत काही तांत्रिक अडचण आल्याने गोखले पूल आणि बर्फीवाला पूल दोघांत 2.8 मीटरचे अंतर वाढले. त्यामुळे दोन पूल जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे पालिकेला मोठय़ा प्रमाणात टीका झाली. पालिका अधिकाऱयाच्या म्हणण्यानुसार, रेल्वे प्राधिकरणाच्या अद्ययावत मार्गदर्शक सूचनांमुळे गोखले पुलाची उंची वाढली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी जोडकामाच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजे बर्फीवाला पुलाचा आवश्यक पृष्ठभाग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी आयआयटी आणि व्हीजेटीआयचे तज्ञ तसेच पालिकेचे पूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.

दुसऱ्या बाजूचा गर्डर मे महिन्याच्या अखेरपर्यंत बसवणार!
गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेच्या गर्डरचे 32 पैकी पाच भाग काही दिवसांपूर्वी मुंबईत पोहोचल्यानंतर येत्या 22 एप्रिलपर्यंत उर्वरित भाग मुंबईत पोहोचणार आहेत. त्यानंतर पालिकेने पुलाच्या ठिकाणीच गर्डरचे जोड काम करून मे अखेरपर्यंत दुसऱ्या बाजूचा गर्डर बसवण्यात येणार आहे.