मी अजित पवारांना मानतच नाही!

महाराष्ट्रात दादा भाऊचा वग रंगला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार बतावणी सुरू आहे. ‘मी अजित पवारांना मानतच नाही’ अशी कलगी आमदार पडळकर यांनी करताच मिटकरी यांनी ‘आम्ही सत्तेत असल्याचे विसरून जाऊ !’ असा तुरा फेकला आहे.

वायफळ बडबडीसाठी कुख्यात असलेले आमदार गोपीचंद पडळकर पवार कुटुंबावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करतात. अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे ही धार कमी होईल असे वाटत होते, परंतु उलटेच झाले. आमदार पडळकर यांनी आपण अजितदादांना गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले. ‘लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू’ अशी टीकाही त्यांनी केली. आरक्षणाच्या मुद्दयावरून ते माझ्यासोबत उभे राहिले किंवा नाही याने काहीही फरक पडत नाही, असा वारही त्यांनी केला. आरक्षणासंदर्भात मी त्यांना पत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.  याच संदर्भात पत्रकारांनी त्यांना छेडले असता मी अजित पवारांना अजिबात सिरियस घेत नाही, मुळात मी त्यांना मानतच नाही, असे म्हणत पुन्हा वादात तेल ओतले.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला. पडळकर यांचा उल्लेख त्यांनी ‘गोप्या’ असा करत त्यांना ‘डुक्कर’ म्हटले. बीड, सोलापूर, नाशिक येथे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी डुकरांची पिले आणून आंदोलन केले. त्यानंतर आता पुन्हा आमदार मिटकरी यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना आवर घालावा ; नसता आम्ही सत्तेत असल्याचे विसरून जाऊ ! असा इशारा दिला. पडळकर हे मंगळसूत्र चोर असल्याचाही त्यांनी आरोप केला.