99 रुपयांच्या स्कीमने दिले मृत्यूला आमंत्रण; गेमिंग झोनच्या आगीत 35 बळी

गुजरातच्या राजकोट येथे टीआरपी शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या गेमिंग झोनला आग लागल्याने 35 जणांचा होरपळून जीव गेला. या गेमिंग झोनमध्ये दर शनिवारी 99 रुपये विकेंड स्कीम सुरू होती. या स्कीममुळे येथे मोठय़ा प्रमाणावर लहानग्यांची गर्दी होती. त्यामुळे 99 रुपयांची स्कीमच जीवघेणी ठरल्याचे उघड झाले आहे.

गेमिंग झोनमध्ये प्रवेशासाठी केवळ 5 ते 6 फुटाचा एकच गेट होता. त्यामुळे अनेकांना आग लागल्यानंतर बाहेर पडता आले नाही आणि अनेकांचा अक्षरशः गुदमरुन जीव गेला. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, टीआरपी गेमिंग झोनकडून येणाऱया प्रत्येकाचे अर्ज भरून घेतले होते. हे अर्ज आता दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेमिंग झोनमध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली किंवा जीवितहानी झाली तर त्यास गेमिंग झोन जबाबदार राहणार नाही असे अर्जात लिहिले होते. या अर्जावर सही केल्यानंतरच ग्राहकांना आत सोडले जात होते. हा अर्ज व्हायरल झाल्यानंतर गेमिंग झोनबद्दल सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

अनेकांची ओळख पटवण्याचे आव्हान

पोलिसांनी याप्रकरणी गेमिंग झोनचे मालक आणि व्यवस्थापक या दोघांना अटक केली आहे. अग्निकांडात अनेकांचा अक्षरशः कोळसा झाला. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्या मृतदेहांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर सखोल चौकशीसाठी 5 सदस्यीय विशेष चौकशी समिती उभारण्यात आली आहे.

हायकोर्टाने घेतली गंभीर दखल

z या भयंकर दुर्घटनेची गुजरात हायकोर्टाने स्वतःहून गंभीर दखल घेतली असून उन्हाळी सुट्टी असतानाही उद्या विशेष न्यायाधीशांचे खंडपीठ याप्रकरणी सुनावणी करणार आहे.