काव्यरसग्रहण – बाप…

>>गुरुनाथ तेंडुलकर

ई… मराठी भाषेतील दोन अक्षरांचा एक छोटासा शब्द, पण हा शब्द उच्चारला की, आपल्या मनामधे अनेक प्रेमळ, स्नेहमयी, वात्सल्यपूर्ण भावना जागृत होतात. आईची महती सांगणारी अनेक संस्कृत सुभाषिते आहेत. मराठीत आईवर लिहिलेल्या अनेक कविता आहेत…‘आईसारखे दैवत साऱया जगतामधी नाही’पासून ते ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’पर्यंत.

आईची महती अपरंपार आहे यात शंकाच नाही, पण आईइतकीच आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आपल्या आयुष्यात असते. ती व्यक्ती म्हणजे आपला बाप!

आईने मूल पोटात वाढवताना सहन केलेल्या वेदना, पुढे बाळाचे संगोपन करताना काढलेले कष्ट, तिने मुलांवर केलेले संस्कार हे सगळे सगळे मान्य आहे, पण त्याचबरोबर बापाने मुलांसाठी केलेला त्याग, स्वतच्या छोटय़ा छोटय़ा हौसेमौजेपासून अनेक भावनांना घातलेली मुरड चटकन कुणाच्या ध्यानात येत नाही. बाप म्हटला की, त्याची एक ठराविक साचेबद्ध प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली (की केलेली?) असते. बाप रागीट असतो, तापट स्वभावाचा असतो. तो विनाकारण ओरडतो, क्वचित मारतोदेखील.

आईची माया आवडते, पण बापाचा धाक, त्याने लावलेली शिस्त, ती मोडल्यानंतर त्याच्या आवाजातून, डोळ्यांतून, किंबहुना संपूर्ण देहबोलीतून व्यक्त होणारा संताप…अजाणत्या पोरवयात हे सगळं नकोसे वाटते. लहान मुलांच्या दृष्टीने आईचा पदर ही सुरक्षित जागा असते, पण बापाच्या बाबतीत… अनेकदा बापाच्या समोर जायला भीती वाटते. पण पुढे वय वाढल्यानंतर ध्यानात येते की, ज्या बापाच्या समोर उभे राहणेदेखील संकटसमान वाटत होते तोच बाप हा सगळ्या संकटापासून रक्षण करणारा आपले सुरक्षा कवच असतो. तो कुटुंबाचा प्रमुख असतो, तो कर्ता असतो. बहुतेक कुटुंबात तो पोशिंदा असतो. याच बापावर आधारित आजची कविता. डॉक्टर संतोष पाठारे यांच्या कवितेचं शीर्षक आहे ‘बाप’.

‘बाप’ नावाचा माणूस समोर असला काय किंवा नसला काय, तो प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनात कायमचा असतोच असतो. हा बाप जोवर सोबत असतो तोवर त्याची किंमत आपल्याला कळत नाही. किंबहुना, अनेकदा तर तो त्याच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे आणि धाकामुळे नकोसाच वाटतो. आपल्यापैकी बहुतेकांनी ‘दंगल’ सिनेमा पाहिला असेल. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता कुमारी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात एक गाणे आहे. ‘बापू सेहत के लिये तू तो हानीकारक है…’

लहान मुलाला आई उचलून कडेवर घेते. बाप मात्र मुलांना आपल्या खांद्यावर बसवतो. याचे कारण ठाऊक आहे आपल्याला? कारण आईला आपण जे पाहिलेय, अनुभवलेय ते सगळे बाळाला दाखवायचे असते. म्हणून ती कडेवर घेते, पण बापाच्या बाबतीत मात्र… आपण जे पाहिले, अनुभवले नाही तेदेखील आपल्या मुलाने पहावे हीच भावना असते. म्हणून तो मुलाला आपल्या खांद्यांवर बसवतो. बापाची ही भावना आपल्याला जाणवत नाही हे दुर्दैव! बापाचे आणि त्याहून अधिक आपले.

बापाचे प्रेम अनेकदा उघडय़ा डोळ्यांना दिसत नाही. स्पर्शातून जाणवत नाही. शब्दांतून ऐकू येत नाही, पण ते सतत सोबत असते. म्हणूनच तर वेदना झाल्यानंतर आपण कळवळून ‘आई गं’ म्हणतो, पण भीती वाटली की, तोंडातून ‘बाप रे’ असे उद्गार आपसूकच येतात. शारीरिक वेदनेवर मलम लावायला आई हवी असते, पण मनातली भीती घालवायला मात्र बापच हवा असतो. अनेक साहित्यिकांनी आईला पृथ्वीची उपमा दिली आहे. ते योग्यही आहे, पण जर आईला पृथ्वी म्हटले तर बापाला सूर्य म्हणावे लागेल. सूर्याचे चटके जाणवतात. त्याचा दाह अनेकदा असह्य होतो, पण तो नसतो तेव्हा… तेव्हा चहूकडून अंधार अंगावर येतो, जीव घाबरा होतो. म्हणूनच तर बाप असेपर्यंत त्याची किंमत जाणवली नाही तरी तो गेल्यानंतर माणसे पोरकी होतात, सैरभैर होतात. अचानक जबाबदारीचे न पेलवणारे ओझे खांद्यावर पडल्यासारखे होते.

बाप गेल्यानंतर जाणवते की, तो असायला हवा होता. त्याच्या धाकासह, त्याच्या शिस्तीसह, त्याच्या नजरेतल्या जरबेसह… कसाही असला तरी तो असायला हवा होता. कारण तो आपला बाप होता. सहज आठवल्या म्हणून एका हिंदी कवितेतल्या दोन ओळी उद्धृत करतोय.

कुछ भी कहे पर यह बात पक्की है ।

बाप की डाँट मे ही बच्चे की तरक्की है ।

बाप

मनाच्या एका कोपऱयात तो अजून बसला आहे

वंशपरंपरेनं विणलेल्या खुर्चीत ठाण मांडून

युगानुयुगाचं जोखड त्याच्याही होतंच खांद्यावर

उजाडताच तो घराबाहेर पडायचा घेऊन, 

दिवेलागण होऊन गेल्यावर

परतायचा थकून भागून

पण नजरेतील जरब ताजीच रहायची पापण्या मिटेस्तोवर…

घरभिंतीपेक्षा मोठय़ा भासायच्या

त्याच्या अस्तित्वाच्या खुणा

त्याच्या करडय़ा सावलीखाली झाकून जायची,

आईची मायाळू लगबग

चिडीचूप होऊन जायचं तिचं गजबजलेलं गोकूळ… 

तो झाला नाही आमचा मित्र, 

कधीच त्याने घातला नाही गळ्यामधे गळा-

दोन-चार लाफे लगावले प्रसंगी

त्यातूनच व्यक्त व्हायचं त्याचं प्रेम-त्याचा लळा

तो बाप होता, बापासारखं जगला

गेल्यानंतर माझ्यामधे,

बाप बनून उरला