चार राज्यांत वादळी पावसामुळे हाहाकार; 4 ठार, 100 जखमी; गुवाहाटीत विमानतळाचे छत कोसळले

पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये आज मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः हाहाकार उडाला. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे चार जणांचा मृत्यू झाला तर 100 हून जखमी झाले. मुसळधार पावसामुळे आसाममधील गुवाहाटी येथील गोपीनाथ बोरदोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे काही काळ विमान वाहतूक बंद करण्यात आली तर सहा उड्डाणे वळवावी लागली.

मिझोराममधील चंफई जिह्यातील लुंगटान गावात चर्चची इमारत कोसळली. आयझॉल जिह्यातील सियालसुक येथे आणखी एका चर्चच्या इमारतीचे नुकसान झाले. काही घरांचेही नुकसान झाले. तर मणिपूरच्या थौबल आणि खोंगजोम भागात अनेक झाडे उन्मळून पडली, अनेक घरांची कौले उडाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृत्यू झालेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.