
डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन स्थगित करत त्याला उद्या, रविवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. म्हात्रे डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांना शरण आला नाही किंवा फरार झाला तर त्याची मालमत्ता जप्त करा, असे न्यायालयाने प्रशासनाला खडसावले आहे.
हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने म्हात्रेला हा दणका दिला आहे. म्हात्रेसह अन्य तीन आरोपांचा जामीन स्थगित केला जात आहे. तेव्हा डॉक्टरांनी किमान जनहितासाठी सोमवारी संप करू नये, असे आवाहन न्यायालयाने केले. पुढील आठवड्यात यावर सविस्तर सुनावणी होईल.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना म्हात्रेने मारहाण केली. याप्रकरणी डॉक्टरांनी जाहीर केलेला संप व म्हात्रेला मंजूर झालेल्या जामिनाची स्वतःहून दखल घेत न्यायालयाने याची स्युओमोटो याचिका दाखल करून घेतली. शनिवारी सुट्टीच्या दिवशी खंडपीठाने यावर सविस्तर सुनावणी घेतली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याची संवेदनशीलता लक्षात घेता आम्ही म्हात्रेसह अन्य तीन आरोपींना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मंजूर केलेला जामीन स्थगित करत आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
चौकशी, जबाब नाही
एवढी गंभीर घटना घडूनही म्हात्रेची चौकशी झाली नाही. त्याचा जबाब नोंदवला गेला नाही. हा मुद्दा दंडाधिकारी न्यायालयाने ग्राह्य धरला नाही. पोलिसांनी म्हात्रेच्या जामिनाला विरोध केला होता. तरीदेखील दंडाधिकारी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. एवढेच काय, तर त्याला कोणतीही कठोर अट न घालता केवळ खटल्याला हजर राहण्याचे आदेश दिले गेले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.


























































