हाँगकाँगच्या या प्रसिद्ध गायिकेचे निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

प्रसिद्ध गायिका, गीतकार आणि अभिनेत्री कोको ली हिचे निधन झाले आहे. वयाच्या 48 वर्षी  कोको लीने  अखेरचा श्वास घेतला. कोको बऱ्याच काळापासून नैराश्यात होती आणि त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिच्या बहिणींनी फेसबुक पोस्टद्वारा माहिती दिली.

कोको ली हिच्या निधनाबाबत कॅरल आणि नॅन्सी या बहिणींनी सोशल मीडियावरुन माहिती दिली. प्रसिद्ध चायनीज गायिका कोको ली ही हाँगकाँगची प्रसिद्ध गायिका होती. ही पहिली अशी चायनीज गायिका होती जिला ऑस्करमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली होती. 1975 मध्ये तिचा जन्म झाला असून बहिणींमध्ये ती सर्वात लहान होती. तिच्या जन्मापूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. ज्यानंतर तिची आई कोकोसह तिच्या बहिणींनाही घेऊन अमेरीकेत नंतर फ्रान्सिस्कोमध्ये स्थायिक झाली. 1992 मध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर कोको आपल्या वाढदिवसादिवशी हाँगकाँगला गेली होती. जिथे तिने एका स्पर्धेत भाग घेतला होता आणि पहिले बक्षिस मिळवले होते. तिथूनच तिच्या पॉप सिंगीगला सुरूवात झाली.

कोको ली 30 वर्षांपासून आपल्या गाण्यांनी लोकांचे मनोरंजन केले. कोको ली हिच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहीले की, मागच्या 29 वर्षात कोको हिला आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीच प्रसिद्धी मिळाली. याच्यासोबत तिने अनेक लाईव्ह परफॉर्मन्स केले. कोको ली च्या बहिणींची पोस्ट व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत श्रद्धांजली वाहीली आहे. कोको ली नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांतची मदत घेतली. पण ती नैराश्यातून बाहेर आली नाही. अखेर 2 जुलैला तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयात डॉक्टरांच्या टीमने कोको ली हिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रत्नन केले मात्र 5 जुलैला तिने अखेरचा श्वास घेतला.

कोको ली ने 1998 मध्ये डिज्नी फिल्म मुलान चे शीर्षक गीत रिफ्लेक्शन गायले होते आणि एंग ली च्या ‘क्राऊचिंग टायगर’, ‘हिडन ड्रॅगन’ मधील ‘अ लव्ह बिफोर टाईम’ हे गाणं गाऊन ऑस्करमध्ये परफॉर्म करणारी पहिली गायिका ठरली होती.