आर्थिक सल्लागाराला लावला चुना; हॉटेलला रेटिंग देणे पडले महागात

हॉटेलला रेटिंग दिल्यास खात्यात दीडशे रुपये जमा होतील असे सांगून ठगाने आर्थिक सल्लागाराला 9 लाख 35 हजार रुपयांना चुना लावला आहे. फसवणूकप्रकरणी दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे दहिसर येथे राहत असून ते आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात. जून महिन्यात त्याना मोबाईलवर एक मेसेज आला. त्या मेसेजला त्याने रिप्लाय दिला. हॉटेलला रेटिंग दिल्यास तुमच्या खात्यात दीडशे रुपये जमा होतील असे त्याना सांगण्यात आले. त्यानंतर ठगाने त्याच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्या लिंकवर रेटिंग दिल्यावर सुरुवातीला त्याच्या खात्यात 900 रुपये जमा झाले. त्यानंतर ठगाने त्याना आणखी टास्क करायचे असल्यास दोन हजार रुपये जमा करायला लागतील असे भासवले.

2 हजार रुपयाचा टास्क पूर्ण केल्यास 2800 रुपये मिळणार असे त्याना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून त्याने 2 हजार रुपये एका खात्यात पाठवले. लिंकवर माहिती भरल्यानंतर त्याना एकाचा फोन आला. ते पैसे कस्टमर केअरमधून मिळतील, त्यासाठीदेखील लिंकवर माहिती भरावी लागेल असे त्याना सांगण्यात आले. ठगाने त्याना टास्कच्या नावाखाली जास्त पैसे मिळतील अशा भूलथापा मारल्या. तुमचा क्रेडिट स्कोअर 80 असून तो 100 असणे गरजेचे आहे. जर 3 लाख 69 हजार रुपये न भरल्यास पैसे मिळणार नाहीत. पैसे मिळणार या हेतूने त्याने 9 लाख 35 हजार रुपये विविध खात्यांत वर्ग केले. पैसे भरल्यावर त्याच्याकडे आणखी पैशाची मागणी करण्यात आली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.