शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे – नितीन बानुगडे

भाजप सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. या सरकारच्या काळात दिवसाला दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करत आहेत. ‘उज्ज्वला गॅस योजने’चे तीन तेरा वाजले आहेत. वीस पटाच्या आतील शाळा बंद करण्याच्या निर्णयाने महाराष्ट्राची वाट लागणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार संविधानाच्या विरोधात वागत आह़े आपली मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे. आता तर मुंबईत मराठी माणसाला घर पण नाकारले जातेय. उद्या हे हाकलून देतील. हे सगळं थांबवायचं असेल तर शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.

मेढा येथे ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाच्या सांगता समारंभात प्रा. बानुगडे पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना सातारा जावली विधानसभा क्षेत्रप्रमुख एस. एस. पार्टे, संपर्कप्रमुख शंकरराव सकपाळ, नामदेव बांदल, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, किसन वीरचे संचालक हणमंतराव चवरे, तालुकाप्रमुख नितीन गोळे, रामदास कांबळे, हैबतराव नलावडे, नंदू घाडगे, उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे, शहरप्रमुख सचिन जवळ, बाळासाहेब शिंदे, सचिन करंजेकर, आतिश कदम, नितीन पार्टे, रामचंद्र चिकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार सपकाळ आणि जिल्हाप्रमुख मोहिते यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. उपजिल्हाप्रमख धनावडे यांनी सूत्रसंचालन केल़े

‘भाजपवाल्यांना आश्वासने पूर्ण केली का, याचा जाब विचारा’

2014 साली भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देऊन मते मागितली. परंतु, भाजपने सत्तेवर येऊन नऊ वर्षे पूर्ण झालेत. जाहीरनाम्यात दिलेले कुठलेही आश्वासन पूर्ण केले नाही. म्हणून मतदारांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या लोकप्रतिनिधींना दिलेल्या आश्वासनाबाबत जाब किचारा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी ‘होऊ द्या चर्चा ’ अभियानांतर्गत कार्यक्रमात बोलताना नागरिकांनी केले.

‘होऊ द्या चर्चा ’ या अभियानांतर्गत सोलापूर शहरातील प्रभाग 3 मधील भवानी पेठ येथे अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, विष्णू कारमपुरी, अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, रेखा अडकी, मंगल थोरात, शिवा ढोकळे, दीपक दुधाळे, गणेश कडवणे आदीं उपस्थित होते.

साताऱ्यात अभियानाला प्रतिसाद
सातारा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानादरम्यान शिवसैनिक शहरातील विविध भागांत जाऊन नागरिकांची भेट घेत त्यांना माहितीपत्रके वितरित करत आहेत. या माहितीपत्रकात महागाईसह केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या तसेच कामाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

या अभियानात जिल्हा उपप्रमुख विश्वनाथ धनवडे, बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, मंजिरी सावंत, गणेश अहिवळे, सुनील पवार, शिवाजी इंगवले, सुमित नाईक, शिवेंद्र ताटे, सादिक शेख आदी सहभागी झाले आहेत.

तासगावात अभियानास प्रचंड प्रतिसाद
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाला तासगाव शहरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

या अभियानातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांची माहिती आणि सध्याच्या ट्रिपल इंजिन राज्य सरकारचे व केंद्र सरकारची खोटी आश्वासने, वाढती महागाई याचा आढावा असलेली पत्रके पदयात्रा करीत घरोघरी पोहोचवली. यावेळी चर्चा करताना लोकांनी मोदी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

यावेळी संपर्कप्रमुख मंगेश मोकाशी, तालुकाप्रमुख प्रदीप माने-पाटील, विशाल शिंदे, पुरण मलमे, अश्विनी मोकळे, शोभा मुळीक, लक्ष्मी पोतदार, छाया पाटील, सुनीता थोरात, वर्षा सर्जे, वंदना लेंग्रे, सरिता वायदंडे, सुनीता चोपडे, सुशांत यादव, संभाजी पाटील, राजमाने, संजय पाटील, तानाजी पाटील, नारायण पोतदार आदी उपस्थित होते.