शिर्डी, शनिशिंगणापूरसह भंडारदरा परिसरात प्रचंड गर्दी, नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक, पर्यटक दाखल

मावळत्या वर्षाला निरोप आणि देवदर्शनासह पर्यटनाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नगर जिह्यातील शिर्डी, शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळांसह भंडारदरा आणि कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत, तर शनिशिंगणापुरातही मोठय़ा संख्येने भाविक शनीचरणी लीन झाले आहेत.

‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी भंडारदरा परिसरात पर्यटकांची आणि उत्साही नागरिकांची नेहमीच गर्दी होत असते. दोन वर्षांच्या कोरोनामुळे या ठिकाणी कुठलाच उत्सव झाला नव्हता. यावर्षी मात्र ‘थर्टी फर्स्ट’चा उत्सव मोठय़ा दिमाखात आणि आनंदात साजरा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आज सकाळपासूनच मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नगर, इगतपुरीकडून भंडारदरा परिसराकडे येणाऱया रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्दळ होती. मुंबई, पुणे, नाशिक, नगर जिह्यातील नागरिक मोठय़ा संख्येने सहकुटुंब सहपरिवार मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा परिसरात जमले आहेत.

भंडारदऱयातील व्यावसायिकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. सर्व ठिकाणी हॉटेल, ढाबे, टेन्ट हाउस या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच, संगीताचा कार्यक्रमदेखील ठेवण्यात आलेला आहे. चहापाणी, नाश्त्याबरोबरच चमचमीत लज्जतदार शाकाहारी-मांसाहारी जेवणाची रेलचेल असणार आहे. भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटरला असणाऱया रिंग रोडवर वाहनांची वर्दळ आहे. तपासणी नाक्यावर वन विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपासणी होत आहे. वन विभाग आणि पोलिसांनी थर्टी फर्स्ट साजरा करताना विविध नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे.

  • सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीनगरी सज्ज झाली आहे. पहाटेपासूनच लाखो साईभक्तांची गर्दी दिसून आली आहे. सगळ्या भक्तांना साईबाबांचे दर्शन घेता यावे, यासाठी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. नवीन वर्षानिमित्त साई समाधी मंदिर, चावडी, द्वारकामाई येथे आकर्षक फुलांची सजावट व नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून, साईनामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेलीय. गेली दोन वर्षे दैनंदिनी आणि कॅलेंडर वेळेत उपलब्ध न झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला होता. मात्र, यावर्षी साईबाबा संस्थानने दैनंदिनी आणि कॅलेंडर वेळेत उपलब्ध करून दिल्याने भाविक आनंदी आहेत.
  • शनिशिंगणापुरात मोठय़ा संख्येने भाविक दाखल झाले. रात्री 12 नंतर नववर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले. मंदिरात भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले असून, शनी चौथऱयावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी महाआरतीला प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली. अभिषेक भवनात होमहवन, पूजा-अभिषेकसाठी भाविकांची संख्या लक्षणीय होती. महाद्वार परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. वाहनतळांसह हॉटेल्स, लॉज, भक्तनिवास हाऊसफुल्ल झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार आल्यामुळे गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने सुरक्षा कर्मचारी व पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.

साईचरणी सोन्याचा मुकुट दान

बंगळुरू येथील दानशूर साईभक्त राजा दत्ता व शिवानी दत्ता यांनी 928 ग्रॅम वजनाचा 46 लाख 70 हजार 624 रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिला आहे. संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे शनिवारी हा मुकुट सुपूर्द करण्यात आला.

पंढरीत भाविकांची गर्दी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलभक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाले. वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्दळ वाढत आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.