रोजचाच चंद्र… भासतो नवा नवा! वेलकम ‘चांद्रयान-3’; ‘इस्रो’ने शेअर केले ताजे सुंदर फोटो

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने सोमवारी ‘चांद्रयान-3’संबंधी नवीन अपडेट शेअर केले.  हिंदुस्थानचे ‘मिशन चंद्र’ प्रत्येक तासाला पुढे पाऊल टाकत आहे. चंद्रापासून अवघ्या काही अंतरावर ‘चांद्रयान-3’ पोहोचले आहे. ‘चांद्रयान-2’ व  ‘चांद्रयान-3’ यांच्यात यशस्वीपणे संपर्क झाला आहे. ‘चांद्रयान-2’च्या कक्षेने यान-3 चे ‘वेलकम’ अशा शब्दांत स्वागत केले. या दोघांत संवादसुद्धा झाला आहे. ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-3’चे चंद्रावरील लॅण्डिंगचे ताजे अपडेट दिले आहे.

हिंदुस्थानचे ‘चांद्रयान-3’ यशस्वीपणे चंद्रावर लॅण्डिंग होईल, अशा शब्दांत ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि ‘चांद्रयान-2’ आणि ‘चांद्रयान-3’ च्या लाँचिंगवेळी ‘इस्रो’चे सहकारी एअरोस्पेस वैज्ञानिक प्राध्यापक राधाकांत पाधी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ‘चांद्रयान-2’ च्या अपयशानंतर ‘इस्रो’ने खूप सारे बदल केले आहेत. यान-3 ला असे बनवले आहे की, ते यशस्वीपणे चंद्रावर लॅण्डिंग करेल.

‘इस्रो’ने शेअर केला सुंदर फोटो  

‘इस्रो’ने सोमवारी लँडर हजार्ड डिटेक्शन अॅण्ड अव्हाइडेंस कॅमेरा (एलएचडीएसी) मध्ये कैद केलेला चंद्राच्या सुदूर पार्श्वचा सुंदर फोटो जारी केला. हे फोटो चंद्राच्या खूपच जवळून काढले आहेत.

लॅण्डिंग अपडेट

‘इस्रो’ने 21 ऑगस्टची ‘चांद्रयान-3’ च्या लॅण्डिंगवरील ताजी अपडेट शेअर केली आहे. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.04 वाजता चंद्रावर लॅण्डिंग होईल. लॅण्डिंग प्रसारण हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी 5.20 मिनिटांवर सुरू होईल.

चांद्रयान-2 शी संपर्क

चंद्राच्या दिशेने जात असलेले यान-3 ची चांद्रयान-2 च्या कक्षेशी यशस्वीपणे संपर्क केला आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती ‘इस्रो’ने सोमवारी दिली. या दोघांत संवाद झाला आहे. चांद्रयान-2 कक्षेने यान-3 चे चंद्राच्या कक्षेत स्वागत केले आहे.

‘लँडिंगचा सोहळा मुलांसोबत पाहणार

‘चांद्रयान-3’चा लँडिंग सोहळा हा अभिमानाचा क्षण असून तो मी माझ्या मुलांसोबत पाहणार आहे, असे बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर हिने म्हटले आहे. मुंबईतील एका पत्रकार परिषदेत पत्रकाराने करीनाला ‘चांद्रयान-3’संबंधी विचारले असता तिने ही प्रतिक्रिया दिली.