लातूर तालुक्यातील बामणी शिवारात गुऱ्हाळास सुरुवात; दीड ते दोन महिने चालणार गुऱ्हाळ

लातूर जिल्ह्यात वाढलेली साखर कारखानदारी आणि गुळ उद्योग यामुळे गुऱ्हाळे सुरू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. आता लातूर तालुक्यातील बामणी शिवारामध्ये गुऱ्हाळाची चूल पेटलेली आहे. यातून सुमारे 20 जणांना रोजगार उपलब्ध झाला असून एका आदणामध्ये दहा किलो वजनाच्या गुळाच्या 23 ढेपा तयार होत आहेत. आणखी सुमारे दीड ते दोन महिने गुऱ्हाळे सुरू राहणार आहेत.

लातूर जिल्ह्यात सहकारी, खाजगी साखर कारखानदारी जोरात आहे. या सोबतच बरेच गुळ उद्योग ही सुरु झाले आहेत. त्यांच्याकडून ऊसाला पहिला हप्ता 2800 रुपयांचा दिला जात आहे. त्यामुळे ऊसाचा अंतिम दर 3100 ते 3200 रुपयांपर्यंत जाईल असे सांगितले जात आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे अनेकांनी ऊसही मोडला आहे. ऊसाचा उतारा असला तरी वजन कमी असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी घट झालेली आहे. यावर्षी गुऱ्हाळ सुरू होतीलच की नाही अशी परिस्थिती होती.

लातूर तालुक्यातील मौजे बामणी येथील शेतकरी अरविंद माडे यांनी गुऱ्हाळाची माहिती देताना सांगितले की, आपण आजपर्यंत साखर कारखान्याला ऊस दिलेला नाही. मागील चाळीस वर्षांपासून गुऱ्हाळ सुरू करण्यात येते. सुमारे दीड ते दोन महिने गुऱ्हाळ चालू असते. यावर्षी साखर कारखानदारांकडून उसाला अधिक भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गुऱ्हाळ गाळणे परवडणार नाही असे वाटत आहे. पण गुळाचा भाव वाढेल अशी अपेक्षा आहे. दहा किलोची गुळाची ढेप 400 रुपयांना दिली जाते. त्यात वाढ होईल, असेही ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी गुऱ्हाळास सुरुवात झाली आहे. सध्या दहा किलोची ढेप काढली जात आहे. एक किलोची ढेप ही काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या गुऱ्हाळाच्या माध्यमातून 20 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे मजूरांच्या जनावरांच्या चाऱ्याचीही सोय होते. आठ एकर त्यांचा ऊस आहे. सध्या दररोज तीन आदण निघतात. एका आदणास सध्या 23 ढेपा दहा किलोच्या निघत आहेत. पुढील काही दिवस ही संख्या 25-26 पर्यंत जाईल, असेही ते म्हणाले. गुऱ्हाळ सुरू झाल्यानंतर दररोज या ठिकाणी जत्रा भरल्याप्रमाणे गर्दी असते. रस पिण्यासाठी लहान थोर मोठ्या प्रमाणात येतात. यात खरे समाधान मिळते, असेही अरविंद माडे यांनी सांगितले.