नगरमधून ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याचा पेच निर्माण होणार?

नगर जिह्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला, तरी ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्यासंदर्भात पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा पेच कशा पद्धतीने हाताळला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पाणीसाठा कमी असलेल्या मराठवाडय़ातील जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नगर व नाशिक जिह्यांतील शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. कारण 15 ऑक्टोबरपर्यंत पुरेसा पाऊस होऊन जायकवाडीचा पाणीसाठा 65 टक्के न झाल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर व नाशिक जिह्यांतील धरणांतून पाणी सोडावे लागणार आहे. तर, दुसरीकडे वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आताच घाई करू नये, अशी मागणी नगर जिह्यातून होत आहे. समन्यायी पाणीवाटप मंडळाचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासंबंधी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे यांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नगर जिह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या जिह्यात चाराबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार पाणी कशा पद्धतीने वितरित करायचे, याचे निश्चित धोरण न ठरल्यामुळे आगामी काळामध्ये जायकवाडीला पाणी देण्याची वेळ आली तर ते कशा पद्धतीने द्यायचे? याचा पेच निर्माण होणार आहे. जायकवाडीमध्ये पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे नगरमधील भंडारदरा व मुळा धरणांतून पाणी द्यायचे असेल, तर त्यासंदर्भातील भूमिका अगोदर जाहीर करावी लागेल, असे अनेकांचे मत आहे.

नगरमधील भंडारदरा धरण भरले आहे. त्यामुळे यातील अतिरिक्त पाणीसाठा होईल तो सोडता येऊ शकतो. पण पुढच्या वर्षीचे नियोजन करताना नगर जिह्यातील सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे पाणीवाटपासंदर्भातील धोरणाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली जाईल का? हा प्रश्न आहे. मराठवाडय़ातही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे, असा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. जायकवाडी धरणात सध्या 33 टक्के पाणीसाठा आहे. त्यातून 1 सप्टेंबरपासून 180 दशलक्ष घनफूट पाणी 25 दिवसांच्या आवर्तनाद्वारे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा घटणार आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे म्हणाले, ‘एमएमक्यूआरए’च्या कायद्यानुसार 15 ऑक्टोबरच्या स्थितीनुसार वरच्या धरणातील पाणी सोडण्याची तरतूद आहे. नगर व नाशिक जिह्यांतील धरणांतील पाणीस्थिती निळवंडे, भंडारदरा, नांदुर मधमेश्वर 100 टक्के, दारणा, मुकणे, वाकी, भावली, वालदेवी साधारण 60 ते 70 टक्के आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून समन्यायी पाणीवाटप मंडळाचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे कुठेही पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सध्या समाधानकारक साठा; पण…

महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण कायदा-2005मधील तरतूदीनुसार 15 ऑक्टोबरपर्यंत ‘जायकवाडी’चा पाणीसाठा 65 टक्के न झाल्यास नगर व नाशिकमधून पाणी सोडण्याची तरतूद आहे. नगर नाशिकच्या धरणात सध्या समाधानकारक साठा आहे. मात्र, पाऊस झाला नाही, तर ही धरणे भरण्याची शक्यता कमी आहेच, शिवाय सध्याच्या साठय़ातूनही जायकवाडीला पाणी देण्याची टांगती तलवार आहे.